लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येथील रेल्वेस्थानकावर बॉम्ब ठेवल्याची माहिती एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) च्या दिल्लीतील मुख्यालयात देऊन तपास यंत्रणांमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. ईश्वर ललित सावलकर (वय २२) असे आरोपीचे नाव आहे.वर्धा मार्गावरील उज्ज्वलनगरात राहणारा सावलकर पुण्याला एका महाविद्यालयात पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाला तिसऱ्या वर्गाला शिकतो. त्याचा मामा पत्रकार असल्याचे सांगितले जाते. तो दिवाळीच्या निमित्ताने नागपुरात आला. शुक्रवारी पहाटे २. २५ वाजता त्याने एनआयएच्या दिल्लीतील मुख्यालयात फोन करून नागपूरच्या रेल्वेस्थानकावर दहशतवाद्यांनी बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. हा फोन कॉल नागपुरातून आल्यामुळे एनआयएच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक वरिष्ठांशी संपर्क साधला. त्यानंतर बीडीडीएस, एटीएस आणि गुन्हे शाखेसह सीताबर्डी आणि सोनेगाव पोलिसांनी आपापली जबाबदारी सांभाळली. रेल्वेस्थानकावर कसून शोध घेण्यात आला तर, फोन कॉल्सच्या लोकेशनवरून फोन करणाऱ्या ईश्वर सावलकरला भल्या सकाळी पोलिसांनी हुडकून काढले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.उपद्रवी स्वभावगुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार आणि किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक संतोष खांडेकर, एपीआय गणेश पवार यांनी सावलकरची चौकशी केली. त्याने दारूच्या नशेत नैराश्यामुळे हा उपद्रव केल्याचे सांगितले. सावलकरचे वडील मरण पावल्यापासून तो कधीमधी असा उपद्रव करतो. त्याचा त्रास यापूर्वी त्याच्या शेजाऱ्यांनाही झाला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.
नागपूर रेल्वेस्थानकावर बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरविणाऱ्या तरुणास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 23:10 IST
रेल्वेस्थानकावर बॉम्ब ठेवल्याची माहिती एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) च्या दिल्लीतील मुख्यालयात देऊन तपास यंत्रणांमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली.
नागपूर रेल्वेस्थानकावर बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरविणाऱ्या तरुणास अटक
ठळक मुद्देराष्ट्रीय तपास संस्थेच्या मुख्यालयात फोन : तपास यंत्रणांमध्ये खळबळ