लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : होय आम्ही गांधीवादी हे क्रांतिकारकच आहोत. पण बंदुकधारी नाही म्हणून सरकारला घाबरण्याची काही गरज नाही, या शब्दात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले.
समाजात शांतता आणि सामाजिक सौहार्द निर्माण व्हावा यासाठी तुषार गांधी यांच्या नेतृत्वात दीक्षाभूमी नागपूर ते सेवाग्राम (वर्धा) दरम्यान २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान 'संविधान सत्याग्रह पदयात्रा' काढण्यात येणार आहे. या यात्रेबाबतची माहिती देण्यासाठी ते सोमवारी प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी गांधीवादी संस्थेमध्ये अर्बन नक्षलवादी घुसल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात पत्रकारांनी त्यांना विचारणा केली असता तुषार गांधी म्हणाले, गांधीवादी हे देशभक्त क्रांतीकारक आहेत. क्रांतिकारक हे सत्तेमध्ये बसलेल्यांची झोप उडवतात. म्हणून सत्तेत बसलेले क्रांतिकारकांना घाबरतात. मुख्यमंत्री ज्या विचारसरणीचे आहेत. त्यामुळेही ते क्रांतीकारकांना घाबरतात. माओवादीबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, माओवादी हे असामानते विरोधात लढणारे क्रांतिकारी आहेत. परंतु व्यक्तिगतरित्या हिंसा आम्हाला मान्य नाही. व्यवस्थेविरोधात लढणाऱ्यांना प्रस्थापिकतांकडून नेहमीच वेगवेगळी दूषण दिली जातात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या यात्रदरम्यान शेतकरी, बिहारमधील एसआयआरसह सर्व ज्वलंत मुद्यांवर चर्चा केली जाईल. पदयात्रेत इंडिया आघाडीच्या सर्व घटक दलांसह संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व संघटना आणि आंबेडकरी विचारांच्या संघटनांनाही सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी पदयात्रेचा लागो, गीत आणि गुगल फाॅर्मच्या लिंकचे लोकार्पण करण्यात आले. पत्रपरिषदेला पदयात्रा समन्वयक संदेश सिंगलकर, गुड्डी एस्सल, जगजीत सिंग, अविनाश काकडे, अतुल शर्मा, सुदाम पवार, शरद कदम, वंदन गडकरी उपस्थित होते.
निवडणूक आयोगाने विश्वसनीयता गमावली
मतदार यादी आणि निवडणूक संबंधात जे काही मुद्दे उपस्थित झाले. त्याबाबत निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीची भूमिका घेतली आहे, त्यावरून निवडणुक आयोगाने विश्वसनीयता गमावलेली असल्याची टीकाही तुषार गांधी यांनी यावेळी केली. वोट चोर... या मुद्द्याने बिहारमध्ये जनआंदोलनाचे रूप घेतल्याचेही ते म्हणाले.
अशी राहील पदयात्रा
पदयात्रा २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत दीक्षाभूमी नागपूर ते सेवाग्राम आश्रम, वर्धा अशी निघणार आहे. या पदयात्रेत ७५ मुख्य पदयात्री राहणार असून त्यांची निवड १ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर या कालावधीत गुगल फॉर्मद्वारे केली जाईल. प्रत्येक पदयात्रेसाठी गुगल फॉर्म भरणे अनिवार्य आहे. त्याव्यतिरिक्त कितीही पदयात्री सहभागी होऊ शकतील, असे मुंबई येथील गुड्डी यांनी सांगितले. या दरम्यान बुटीबोरी, केळझर व नालवाडी येथे जाहीर सभाही होणार आहे. याशिवाय २८ सप्टेंबर रोजी व्हेरायटी चौक ते संविधान चौक मशाल यात्रा काढण्यात येणार असून तेथेही सभा होईल.