यंदाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत; नागपुरातील ५० कोटींच्या २५० पेक्षा जास्त निविदा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 10:44 AM2021-11-30T10:44:41+5:302021-11-30T10:45:35+5:30

हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी निविदा जारी करण्यात आल्या होत्या, पण यावर्षी अधिवेशन मुंबईत होणार असल्यामुळे याच्याशी जुळलेल्या सर्व निविदा रद्द करण्यात आल्या आहेत.

This year's winter convention in Mumbai; More than 250 tenders worth Rs 50 crore canceled in Nagpur | यंदाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत; नागपुरातील ५० कोटींच्या २५० पेक्षा जास्त निविदा रद्द

यंदाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत; नागपुरातील ५० कोटींच्या २५० पेक्षा जास्त निविदा रद्द

Next
ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्णय

नागपूर : विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत करण्याची घोषणा होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) नागपुरातील ५० कोटी रुपयांच्या २५०पेक्षा जास्त निविदा रद्द केल्या आहेत. पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. निविदा हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी जारी करण्यात आल्या होत्या, पण यावर्षी अधिवेशन मुंबईत होणार असल्यामुळे याच्याशी जुळलेल्या सर्व निविदा रद्द करण्यात आल्या आहेत.

आधी हिवाळी अधिवेशन नागपुरात ७ डिसेंबरपासून होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. या अधिवेशनाच्या तयारीवर बैठका होऊ लागल्या होत्या, पण त्याचवेळी अधिवेशन होणार वा नाही, यावरही संभ्रमाची स्थिती होती. अधिवेशनासाठी होणाऱ्या गर्दीमुळे कोविड संक्रमणाची तिसरी लाट तर येणार नाही, यावरही शंका व्यक्त करण्यात येत होती. तर दुसरीकडे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्यावर चर्चा सुरू होती. ‘लोकमत’ने १४ नोव्हेंबरच्या अंकात अधिवेशन मुंबईतच होणार, असेही स्पष्ट केले होते.

या दरम्यान अधिवेशनाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर पीडब्ल्यूडीने जवळपास ५० कोटी रुपयांच्या २५०पेक्षा जास्त निविदा जारी केल्या होत्या, पण कार्यादेश दिले नव्हते. जर अधिवेशन मुंबईत झाले तर तयारीवर झालेला खर्च वाया जाईल तसेच अधिवेशन नागपुरात होण्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतरच कार्यादेश देण्यात येईल, असे विभागाने स्पष्ट केले होते. सोमवारी विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्यावर शिक्कामोर्तब झाल्यावर पीडब्ल्यूडीने निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

कंत्राटदारांना झटका; अधिकाऱ्यांना दिलासा

निविदा रद्द झाल्याने कंत्राटदारांना मोठा झटका बसला आहे. कंत्राटदारानुसार हिवाळी अधिवेशनाशी एक समांतर अर्थचक्र जुळले आहे. त्यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळतो. छोट्या व्यावसायिकांना फायदा होतो. आता हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार नसल्यामुळे कंत्राटदार, हॉटेल, रेस्टॉरंट, पेन्डॉल आदींसह अन्य व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे.

तर, दुसरी अधिकाऱ्यांची वेगवेगळी मते आहेत. काही अधिकारी दिलासा मिळाल्याचे सांगत आहेत. जर प्रत्यक्ष तयारी सुरू झाली असती, तर अनेक कोटी रुपये वाया गेले असते. तर अधिवेशनाशी जुळलेले काही अधिकारी अधिवेशन रद्द झाल्यामुळे दु:खी आहेत. कारण यंदा त्यांची कमाई होणार नाही.

नागपूर अधिवेशन हिसकविण्याचे षडयंत्र

विदर्भवादी नितीन रोंघे यांनी हिवाळी अधिवेशन नागपुरातून हिसकविण्याचे षडयंत्र असल्याची शंका व्यक्त केली. यावर्षीचे अधिवेशन कुठल्याही अडचणीविना नागपुरात होऊ शकले असते. पण राज्य सरकारने मुंबईत करण्याचा निर्णय घेऊन नागपूर कराराचे उल्लंघन केले आहे.

मुद्दे -

  • - नागपुरातील हिवाळी अधिवेशन आता मुंबईत
  • - विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीचा निर्णय
  • - निविदा जारी, पण कार्यादेश दिले नव्हते
  • - अधिवेशन हिसकविण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप
  • - काही अधिकाऱ्यांना दिलासा तर काही दु:खी
  • - अधिवेशनाशी संबंधित कंत्राटदारांचे नुकसान
  • - अधिवेशन हे एक समांतर अर्थचक्र

Web Title: This year's winter convention in Mumbai; More than 250 tenders worth Rs 50 crore canceled in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.