लोकमत विशेषराहुल अवसरे नागपूर १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी याकूब अब्दुल रझाक मेमन याची फाशीच्या शिक्षेविरुद्ध दाखल पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात कोणत्याही क्षणी दिली फाशी दिली जाऊ शकते, अशी दाट शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मेमनची याचिका फेटाळल्याची बातमी नागपुरात येऊन थडकताच येथील कारागृह प्रशासनाने त्याला फाशी देण्याची तयारीही सुरू केली आहे. त्याला विशेष सेलमध्ये ठेवण्यात आलेले आहे. या प्रकरणाशी संबंधित जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले तीन आरोपी याच कारागृहात असून त्यांचा मेमनसोबत संपर्क येऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. कारागृहातील आणि सभोवतालची सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. अतिसुरक्षित समजल्या जात असलेल्या या कारागृहातून ३१ मार्च २०१५ रोजी गुन्हेगारांची संघटित टोळी चालविणाऱ्या कुख्यात राजा गौस याचे याच्या तीन साथीदारांसह पाच जण कारागृहातून पसार झाले. त्यानंतर उघडण्यात आलेल्या कारागृह झडती मोहिमेत ५८ मोबाईल, मादक पदार्थ आढळून आले. त्यामुळे या कारागृहाची एकूण प्रतिमा मलिन झाली. न्यायाधीन बंदी आणि शिक्षा झालेल्या कैद्यांचीही हिंमत वाढून ते या कारागृहाला नंदनवन समजू लागले होते. त्यामुळेच मुंबईचा डॉन अरुण गवळी हे कारागृह पहिली पसंती आहे. या कारागृहाची मलिन झालेली प्रतिमा उजळ करण्यासाठी आणि कारागृहातील बंदिस्त बंद्यांमध्ये दरारा निर्माण करण्यासाठी, कोणत्याही गुन्हेगारांसोबत कोणतीही दयामाया नाही, असा संदेश समाजात पोहचविण्यासाठी याकूबला नागपुरातच फाशी देण्याचे जवळ-जवळ निश्चित झाले आहे. केंद्र आणि राज्यातील भाजपचे सरकार एका विशिष्ट समुदायाच्या बळावर सत्तारूढ झालेले आहे. नागपुरातून या दोन्ही ठिकाणच्या सरकारांना उत्तम पाठबळ मिळालेले आहे. मुख्यमंत्री नागपूरचेच आहेत. या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालयही आहे. त्यामुळे या विशिष्ट समुदायावर परिणाम होऊ नये, यासाठी याकूबला नागपुरात फाशी न देता पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात नेऊन फाशी दिली जाऊ शकते. परंतु ही शक्यता कमी आहे. नागपुरातूनच याकूबला यमसदनी पाठविल्या जाण्याची दाट शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)आतापर्यंत नागपूर कारागृहात २३ जणांना दिली फाशीनागपूर मध्यवर्ती कारागृहाची स्थापना इंग्रज राजवटीत १८६४ मध्ये झाली. या कारागृहात स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत विविध हत्याकांडातील २३ जणांना फाशी देण्यात आली. विशेष म्हणजे आरोपींना फासावर लटकवण्याची सुरुवातही नागपुरातूनच झाली. २५ आॅगस्ट १९५० रोजी पहिल्यांदा नंदाला नावाच्या आरोपीला फासावर लटकवण्यात आले. त्यानंतर १५ डिसेंबर १९५२ रोजी पुण्याच्या येरवडा कारागृहात पहिल्यांदाच एका आरोपीला फासावर चढवण्यात आले. स्वतंत्र्यानंतर राज्यात आतापर्यंत ५८ जणांना फाशी देण्यात आली. नागपूर आणि येरवडा या दोन ठिकाणी फाशी देण्याची व्यवस्था आहे. येथील कारागृहात सर्वप्रथम पंथेयाडी नंदाल याला २५ आॅगस्ट १९५०, जकिया नारायण याला २२ सप्टेंबर १९५० , सीपाराम नुहो याला २० फेब्रुवारी १९५०, सीताराम परय्या याला २६ जून १९५१, इरामन्न उपयोरसी याला ३ आॅगस्ट १९५१, भाम्या गोडा याला ४ आॅक्टोबर १९५१, सरदार याना याला १२ जानेवारी १९५२, नियतो कान्हू याला ३ आॅगस्ट १९५२, अब्दुल रहेमान इम्रानखान याला ५ आॅगस्ट १९५२, गणपत सखराम याला २ सप्टेंबर १९५२, सखराम फोकसू याला २४ सप्टेंबर १९५२, विन्सा हरी याला १९ मार्च १९५३, जागेश्वर मारोती याला १९ जून १९५३, प्रेमलाल अमरीश याला ४ जुलै १९५३, लोटनवाला याला १५ सप्टेंबर १९५३, दयाराम बालाजी याला ३ फेब्रुवारी १९५६, अब्बासखान वजीरखान याला २८ आॅगस्ट १९५९, बाजीराव तवान्नो याला १५ फेब्रुवारी १९६०, श्यामराव पांडुरंग याला ८ जुलै १९७०, नाना गंगाजी याला १९ जानेवारी १९७३, मोरीराम शाद्याजी गोदान याला १७ एप्रिल १९७३ आणि वानखेडे बंधू यांना ५ नोव्हेंबर १९८४ रोजी फाशी देण्यात आली होती. त्यानंतर कुणालाही फासावर लटकविण्यात आल्याची माहिती नाही. याकूबला फाशी दिल्यानंतर याच कारागृहात वाडीतील एका बालिकेवरील बलात्कार-खुनातील आरोपी वसंता दुपारे यालाही फिशी दिली जाऊ शकते. या आरोपीचीही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्याने सध्या राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला आहे.
याकूब मेमनला नागपुरात कोणत्याही क्षणी फाशी
By admin | Updated: April 10, 2015 02:10 IST