पार्श्वगायक सुरेश वाडकर : आजचे संगीत डान्स अॅटमनागपूर : एखाद्या चित्रपटावर वाद निर्माण करून तो बंद पाडणे चुकीचे आहे. छोट्याशा बाबीला किती महत्त्व द्यायचे, हे आपण ठरविले पाहिजे. चित्रपटात एखादी बाब चुकीची असेल तर ती संबंधितांना पटवून द्यायला हवी, त्याबाबत चर्चा करायला हवी. चित्रपट बंद पाडणे ही लोकशाही नाही, असे मत सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांनी व्यक्त केले. संगीतकार दत्ता हरकरे यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘स्वर अमृताचे’ या सीडीचे लोकार्पण करण्यासाठी वाडकर नागपुरात आले होते. याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाबाबत वाद सुरू असला तरी त्याने चित्रपटाचे महत्त्व कमी होत नाही. सेन्सॉर बोर्डाने त्याला परवानगी दिली आहे. पण हल्ली वाद निर्माण करण्याचाच पायंडा पडला आहे. संवाद एकूणच समाजात कमी झाला आहे. रिअॅलिटी शोमधून समोर येणाऱ्या गायकांची तयारीच नसते. पण अशा शोमधून अमाप प्रसिद्धी चुकीच्या गायकांना मिळते आणि रियाज करून शिकलेल्या गायकावर मात्र अन्याय होतो. यामुळे रिअॅलिटी शोत जिंकलेल्या गायकाला पैसा देण्यापेक्षा चांगल्या गुरूकडे शिकण्यासाठी पाठवायला हवे. रिमिक्स हे शुद्ध संगीत नाही. त्यावर केवळ नाच करता येतो. उद्या एखाद्याच्या अंत्ययात्रेत लोक रिमिक्स लावून नाचतील की काय, अशी भीती वाटते. पुरस्कार वापसीबाबत आपण काहीही बोलणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी दत्ता हरकरे, कनका गडकरी, अनुजा केदार प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)नाशिक प्रकरणाबाबत बोलणे उचित नाहीनाशिकचे जमीन प्रकरण सध्या न्यायालयात आहे. त्यात माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले पण माझी बाजू मी मांडली आहे. शासनानेच त्याबाबत निर्णय घ्यावा. हे प्रकरण न्यायालयात असल्याने त्यावर बोलणे उचित नाही.
आंदोलन करून चित्रपट बंद पाडणे चुकीचे
By admin | Updated: December 21, 2015 03:17 IST