उमरेड : तहसील कार्यालयात साेमवारी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. कार्यालयाचा समोरील भाग गावागावातील नागरिकांनी गजबजून गेला होता. ग्रामपंचायतीनिहाय गावकऱ्यांचा घोळका, गटागटाने दिसून आला. पहिला निकाल तालुक्यातील चनोडा ग्रामपंचायतीचा लागला. निकाल लागताच गुलालाची उधळण, गळ्यात पुष्पहार आणि सोबतीला बॅण्डबाजाचा जल्लोष सुरू झाला. विशेषत: विजयी उमेदवारांना वा त्यांच्या कार्यकर्त्यांना यासाठी कुठेही भटकंती करावी लागली नाही. पुष्पहार अन् बॅण्डबाजा ‘ऑन दि स्पॉट’ उपलब्ध होत असल्याने एक वेगळाच माहौल बघावयास मिळाला.
निवडून कुणीही येवोत, कोणत्याही ग्रामपंचायतीमधील विजयी होवोत, बॅण्ड एकच ! जल्लोष १४ ग्रामपंचायतींचा सुरू होता. रस्त्याच्या कडेला पुष्पहार आणि गुलाल विक्री करणारे कुटुंबीय सज्ज होते. दुसरीकडे आपला उमेदवार आला रे आला की, हातगाडीवर एकच गर्दी उसळत होती. पुष्पहार घेतला की विजयी उमेदवाराच्या गळ्यात लागलीच पुष्पहार टाकून विजयी जल्लोष साजरा केला जात होता. तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद कदम, नायब तहसीलदार टी.डी. लांजेवार आदींसह सुमारे ५० कर्मचाऱ्यांचा ताफा मतमोजणीच्या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी होते. पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांच्या मार्गदर्शनात चोख पाेलीस बंदोबस्त होता. दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही.