काटोल : काटोल शहरातील जलपर्जन्य वाहिन्याच्या रखडलेल्या कामाला सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी नागरिक कृती समितीच्या वतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांना करण्यात आली आहे. शहरातील जलपर्जन्य वाहिन्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नागरिक कृती समितीच्या वतीने करण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी कृती समितीच्या तक्रारीची दखल घेत चौकशी समितीच्या अहवालाच्या निष्कर्षावरून नगर परिषदेने अंदाजपत्रकात नमूद केलेल्या मानकाप्रमाणे प्रकल्पाचे काम होत नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे येथील काम आठ महिन्यापासून खोळंबळल्या गेले. शहराच्या विकासाकरिता ही मोठी योजना असून, या कामाची गुणवत्तापूर्ण सुरुवात करण्याची मागणी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या कामासाठी काटोल नगर परिषदेला २१ कोटी ३ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. याअंतर्गत काटोल शहरात जवळपास ७० किलोमीटर लांबीच्या जलपर्जन्य वाहिन्याचे काम नाशिक येथील सिटी कन्स्ट्रवेल या कंपनीला दिले होते. या कामाची पाहणी केली असता जलवाहिन्याच्या टेंडरमध्ये अटी व शर्तीनुसार कामे होत नसल्याचे दिसून आले होते. काम गुणवत्तापूर्ण होत नसल्याने बंद करण्यात आले होते. परंतु आठ महिन्याचा कालावधी होऊनही या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही.
काटोलच्या जलपर्जन्य वाहिन्यांचे काम खोळंबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:14 IST