गुन्हेगारांवर धाक ठेवून काम करा

By Admin | Updated: August 27, 2016 02:05 IST2016-08-27T02:05:32+5:302016-08-27T02:05:32+5:30

शहर पोलीस दलाची चमू अतिशय चांगली आहे. सर्वत्र या चमूचे नाव घेतले जाते. गुन्हेगारांवरही पोलिसांचा धाक आहे.

Work with the criminals with fear | गुन्हेगारांवर धाक ठेवून काम करा

गुन्हेगारांवर धाक ठेवून काम करा

पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांनी पदभार सांभाळला
नागपूर : शहर पोलीस दलाची चमू अतिशय चांगली आहे. सर्वत्र या चमूचे नाव घेतले जाते. गुन्हेगारांवरही पोलिसांचा धाक आहे. तो तसाच कायम ठेवून प्रामाणिकपणे आणि सांघिक भावनेने काम करा, असा हितोपदेश शहराचे नवीन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी शुक्रवारी येथील पोलीस अधिकाऱ्यांना केला.
डॉ. व्यंकटेशम यांनी आज सकाळी ११ वाजता पोलीस आयुक्तालय गाठले. मावळते आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना आयुक्तपदाची सूत्रे सोपवली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या छोटेखानी बैठकीनंतर त्यांनी लगेच पोलीस जिमखाना गाठला. येथे पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांनी पहिल्याच बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांना प्रामाणिकपणे आणि सांघिक भावनेने तणावमुक्त काम करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, नागपूर शहर पोलिसांचे सर्वत्र नाव आहे. त्याला बट्टा लागू नये. अवैध धंदेवाले, गुन्हेगार यांच्यावर धाक ठेवूनच काम करा. गुन्हेगारी अवैध धंद्यांमुळेच फोफावते. त्यातून पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे आणि दीर्घकाळ कटू आठवणी ठेवणाऱ्या (कोपर्डीसारख्या) घटना घडतात. त्या घडू नये, यासाठी आम्ही सदैव तत्पर असले पाहिजे. स्वच्छ प्रतिमेचे धनी असलेले आणि कोणत्याही भागात अवैध धंदे आढळल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
१९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले व्यंकटेशम स्वच्छ आणि पारदर्शक कार्यशैलीचे प्रामाणिक अधिकारी म्हणून सर्वत्र ओळखले जातात.
त्यांनी २६ / ११ चा हल्ला, मुंबई अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि अरुण गवळीच्या गुंडांचा केलेला सफाया, राज्यातील पोलीस प्रशिक्षण शाळांचे डिजिटलायझेशन, मुंबई विमानतळावरील सोन्याची तस्करी, बहुचर्चित शिष्यवृत्ती घोटाळा आदी प्रकरणांमध्ये पोलीस अधिकारी म्हणून लक्षवेधी भूमिका वठवली आहे. मुख्यमंत्र्यांचे गृहनगर असलेल्या नागपुरातही त्यांची कारकीर्द ते कशाप्रकारे लक्षवेधी करतील त्याकडे पोलीस दलासह सामान्य नागरिकांचेही लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)

मैत्रीपूर्ण संबंध जोपासा
मावळते पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी आज निरोप घेताना येथील अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या. कुटुंबप्रमुखाला प्रसंगावधान राखत काही वेळा कटू निर्णय घ्यावे लागतात. ते व्यक्तिगत नसतात. त्यामुळे आपण आपले काम अधिक निष्ठेने करावे, असे सांगतानाच सामान्य नागरिकांसोबतच प्रसारमाध्यमांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवा, असा सल्लाही यादव यांनी यावेळी दिला.

Web Title: Work with the criminals with fear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.