लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी आयोजित केलेल्या राज्य सरकारच्या पारंपरिक चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून तसे पत्र शासनाला पाठविण्यात आले आहे. बैठकीनंतर महाविकास आघाडीतर्फे आयोजित संयुक्त पत्रपरिषदेत यासंबंधीची घोषणा करण्यात आली. शेतकरी आत्महत्या, कमी एमएसपी दरात पिकांची खरेदी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था अशा गंभीर समस्यांमुळे जनता हैराण झाली आहे. त्यामुळे सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या पत्रकार परिषदेला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) गटनेते जितेंद्र आव्हाड, शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे सुनील प्रभू, महेश सावंत, जे.एम. अकबर उपस्थित होते.