नागपूर : मंगळवार नंतर बुधवारीदेखील नागपूरकरांना प्रखर उष्णतेचा सामना करावा लागला. बुधवारी शहरात कमाल ४७ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. नवतपा सुरू होण्यासाठी अद्याप आठवड्याहून अधिक अवधी असतानादेखील उपराजधानीचे तापमान तापण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे यंदा तापमानाचा रेकॉर्ड मोडणार की काय अशी चर्चा सुरू आहे.ंमे महिना सुरू झाल्यानंतरदेखील तापमान चढले नव्हते. परंतु गेल्या २ दिवसांपासून पारा वाढतो आहे. बुधवारी कमाल तापमान सरासरीहून ४ अंशांनी अधिक होते. दुपारनंतर उपराजधानीच्या आकाशात काही प्रमाणात ढग दिसून आल्यामुळे उष्णता थोडी कमी होईल असे वाटत होते. परंतु पारा आणखी वाढला. रात्री उशिरापर्यंत उष्ण वारे वाहतच होते. शहरात किमान ३१.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. घरांमध्ये नागरिकांना कूलरमुळेदेखील दिलासा मिळाला नाही. त्यातच अनेक ठिकाणी भारनियमन असल्यामुळे तर दुपारच्या सुमारास नागरिक तर अक्षरश: हैराण झाले होते. येत्या आठवड्यात उष्णता कायम राहील व तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. वाढत्या तापमानामुळे अगोदरच हैराण होत असलेल्या उपराजधानीतील नागरिकांसाठी पुढील काही दिवस परीक्षेचे ठरू शकतात.(प्रतिनिधी)
यंदा रेकॉर्ड मोडणार?
By admin | Updated: May 21, 2015 02:17 IST