लोकमत न्यूज नेटवर्कउमरेड : पीक विम्याच्या नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळती होण्यास सुरुवात झाली आहे. बहुतांश शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अत्यल्प मिळत असल्याने संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबतच्या तक्रारीही शेतकरी करीत असून, संबंधित यंत्रणेच्या निष्काळजी आणि दुर्लक्षितपणाचा फटका कष्टकऱ्यांना सोसावा लागत असल्याचा आरोप केला जात आहे.
मागील खरीप हंगामात केवळ एक रुपयामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला. दुसरीकडे निसर्गाच्या असमतोलपणाचा जोरदार फटका शेती आणि शेतकऱ्यांना बसल्याने अनेकांच्या उत्पादनात कमालीची झाली. निसर्गाच्या घट लहरीपणामुळे सोयाबीनचा दाणा बारीक झाला. शिवाय कपाशीचेही उत्पादन घटले. दोन्ही पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे याबाबतच्या तक्रारी केल्या. कृषी विभागापर्यंतसुद्धा शेतकरी पोहोचले.
उमरेड तालुक्यातील सोनपुरी येथील राहुल भगवान तागडे यांनी १.६५ हेक्टर आर जमिनीचा विमा केला होता. त्यांनी नुकसानीची भरपाईची संपूर्ण प्रक्रिया आटोपली. सर्वेक्षणही करण्यात आले. त्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम केवळ ३,९९९ रुपये आली. झालेल्या नुकसानीची भरपाई मला मान्य नाही. विमा कंपनीने कष्टकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, असा आरोप राहुल तागडे यांनी केला आहे. राहुल यांचे वडील भगवान तागडे यांनीही १ हेक्टर आर क्षेत्रात सोयाबीन पिकाचा विमा काढला. प्रचंड नुकसान झाले. त्यांच्या खात्यात केवळ एक हजार रुपये आले. कुठल्या आधारावर ही तुटपुंजी मदत दिल्या गेली, असा प्रश्न या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
तालुका कृषी कार्यालयाकडे याबाबतची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. आमच्यावर अन्याय झाला असून, चौकशी करण्यात यावी. योग्य भरपाई मिळावी, अन्यथा उपोषणावर बसण्याचा इशारा राहुल तागडे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, आमदार संजय मेश्राम, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण यांच्याकडेही तक्रारीचे निवेदन दिल्या गेले.
समन्वयाचा अभाव
- प्रस्तुत प्रतिनिधीने पीक विम्याच्या नुकसान भरपाईबाबतची आकडेवारी विचारण्यासाठी स्थानिक पीक विम्याचे कार्यालय गाठले. संबंधित कर्मचाऱ्याने माहिती उपलब्ध नसल्याचे कारण सांगत वरिष्ठांना विचारा असे म्हणत टाळले.
- जिल्हा स्तरावर पीक विम्याचे कर्मचारी राहुल सानसे यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनीही टोलटोलवीची उत्तरे देत कृषी विभागाला विचारा असे म्हणत अधिक बोलण्याचे टाळले. तालुका कृषी कार्यालयाचे कृषी पर्यवेक्षक (सांख्यिकी विभाग) विजय गाणार यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी पीक विमा कंपनीकडे बोट दाखवत आमच्याकडे आकडेवारी नसल्याचे सांगितले.
- एकूणच पीक विमा कंपनीचे 3 कार्यालय आणि कृषी विभागाचे अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप राहुल तागडे यांनी केला आहे. सर्वेक्षणाचे कामही थातूरमातूर केल्या गेल्यानेच ही समस्या उद्भवली, असाही आरोप त्याने केला.
८६२ रुपये आले हो...उमरेड तालुक्यातील सोनपुरी येथीलच विलास ठाकरे यांची १६ एकर शेती आहे. त्यांनी ०.८० हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड केली. प्रचंड नुकसान झाले. त्यांच्या खात्यातही केवळ ८६२ रुपये वळती झालेत. १.४५ हेक्टर सोयाबीन पिकाचे नुकसान भरपाई स्वरूपात केवळ ३ हजार रुपये मिळाले.
"पीक विमा कार्यालयात शेतकरी गेल्यावर त्यांचे समाधान होत नाही. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही मिळत नाहीत. शिवाय अनेकदा हे कार्यालय बंदसुद्धा असते. सर्वेक्षणाचे कामही थातूरमातूर केल्या गेले. अनेक शेतात संबंधित विभागाचे कर्मचारीही ऑन दि स्पॉट गेलेच नाहीत."- राहुल तागडे, शेतकरी, सोनपुरी, ता. उमरेड