लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढावी यासाठी सरकारने ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या दोन पर्वात विदर्भात काहीच गुंतवणूक झालेली नाही. तर तिसऱ्या पर्वात विदर्भाचा वाटा फारच कमी आहे. हे पाहता महाविकास आघाडी सरकारचे विदर्भाकडे दुर्लक्ष तर होत नाही ना, असा सवाल माजी आमदार आशीष देशमुख यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
अविकसित भागात उद्योग व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात गुंतवणुकीचे प्रसंग आले की विदर्भात कुणी गुंतवणूकच करायला तयार नाही, तिथे पायाभूत सुविधा नाहीत असे उत्तर सरकारकडून तत्परतेने मिळते. नागपूर येथील मिहानच्या संदर्भात गेल्या वर्षभरात केवळ दोन बैठका झाल्या. या प्रकल्पाचे जे प्रशासकीय प्रमुख आहेत ते एकदाही नागपूरला आले नाहीत. रामदेवबाबा यांचा नागपूरच्या मिहान येथील पतंजली प्रकल्प अजून सुरूच झाला नाही. ती अधिग्रहित करून ‘महाराष्ट्र अॅग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट काॅपोर्रेशन’ला दिल्यास हा महत्त्वाकांक्षी ‘फूड पार्क’ प्रकल्प लवकर सुरु करता येईल, अशी मागणी देशमुख यांनी केली.