अनंता पडाळ
सावनेर : सावनेर तालुक्याचे सत्ताकेंद्र असलेल्या पाटणसावंगी ग्रा.पं.च्या निवडणुकीकडे जिल्ह्यातील पोलपंडितांचे लक्ष लागले आहे. १७ सदस्यीय असलेल्या पाटणसावंगी ग्रा.पं.मध्ये वॉर्ड क्रमांक ६ मधून तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे येथे आता १४ जागांच्या निवडणुकीसाठी गावात प्रचाराचा धुरळा उडाला आहे.
१७ सदस्य असलेल्या या ग्रा.पं.च्या ६ वॉर्डासाठी ७० जणांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामध्ये ३५ जणांनी उमेदवारी मागे घेतली. यासोबतच वाॅर्ड क्रमांक ६ मधील इंदिरा विठोबा काळे, अनिता भाऊराव सिरसाट व राजश्री उमेश कश्यप हे अविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता १४ जागांसाठी ३२ उमेदवार रिंगणात आहे. येथे काँग्रेस समर्थित ग्रामविकास आघाडी पॅनलने १४ ही जागेवर उमेदवार उभे केले आहेत. भाजपा समर्थित सहकार पॅनेलचे ८ तर परिवर्तन ग्रामविकास आघाडीचे ६ उमेदवार आणि १ अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. अशा एकूण तीन पॅनेलने पाटणसावंगी ग्रामपंचायतची सत्ता मिळविण्यासाठी दंड थोपटले आहेत. येथे वॉर्ड क्रमांक १,४ व ५ मध्ये भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होताना दिसते. वॉर्ड क्र. २ व ३ येथे परिवर्तन ग्राम विकास आघाडी विरुद्ध काँग्रेस अशी लढत होताना दिसते. पाटणसावंगी ग्रा.पं.बिनविरोध करण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत झाले. मात्र ते क्षेवटच्या क्षणी यशस्वी ठरले. पाटणसावंगी भाजपचे अध्यक्ष रवींद्र जाधव हे वॉर्ड क्रमांक १ मधून निवडणूक रिंगणात उभे आहेत तर भाजप समर्थित सहकार पॅनेलची धुरा त्यांच्याकडे आहे. येथे कॉँग्रेसचा किल्ला अनिल राय व जानराव केदार लढवित आहे. यासोबतच (तिसरी आघाडी) ग्रामविकास परिवर्तन पॅनेलची धुरा अनिल पानपत्ते यांच्याकडे आहे.
पाटणसावंगी ग्रामपंचायत
एकूण प्रभाग - ६ (१ अविरोध)
एकूण सदस्य- १७ (३ अविरोध)
एकूण मतदार- ९९८४
पुरुष मतदार- ५२४२
महिला मतदार- ४७४२