लोकमत न्यूज नेटवर्क
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी वाढल्यामुळे राजकीय पंडितांकडून विविध कयास लावण्यात येत आहेत. दुसरीकडे सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेस व भाजपाकडून मतदानवाढीचा फायदा आपल्यालाच होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीचा नेमका फायदा कुणाला होईल व पुढील सात फेऱ्यांवर त्याचा काय परिणाम होईल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पहिल्या टप्प्यातील ३० जागांपैकी २६ वर भाजपाचा विजय होईल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शहा यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी असा दावा कसा काय करण्यात येतो हे कोडेच आहे. त्यांनी सर्वच ३० जागांवर विजयाचा दावा का नाही केला. उर्वरित जागा कॉंग्रेस व माकपासाठी सोडल्या आहेत का असा प्रश्न ममता यांनी उपस्थित केला. ८४ टक्के मतदान झाले असून नक्कीच लोकांनी आमच्या बाजूने मतदान केले आहे. आम्ही कुठलाही अंदाज लावणार नाही, असे ममता यांनी सांगितले.
सर्व भर १ एप्रिलवर
१ एप्रिल रोजी निवडणूकांचा दुसरा टप्पा आहे. ममता उभ्या असलेल्या नंदीग्राम येथेदेखील त्याच दिवशी मतदान होणार आहे. तेथे एकूण ३० उमेदवार रिंगणात असून ही लढत तृणमूलसाठी प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे ममतासह तृणमूलच्या नेत्यांनी तेथे प्रचारावर भर दिला आहे. नंदीग्राममध्ये विरोधी पक्ष कार्यकर्ते फोडण्याची शक्यता असल्याने तृणमूलच्या वरिष्ठ नेत्यांनी विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत.