योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राऊळगाव येथील 'एसबीएल की एनर्जी लिमिटेड' या कंपनीत झालेल्या स्फोटात १९ कामगारांचा बळी गेला तर २३ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात मानवी चुकीमुळे झाला 'अर्थिग' सारखी तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने इतके जीव गेले याची चौकशी सुरु आहे. 'एसबीएल'च्या 'नोनल क्रिम्पिंग' युनिटमध्ये तयार झालेली स्फोटके दुसरीकडे न हलविता तेथेच ठेवण्यात आली होती. त्यामुळे एका ठिणगीमुळे स्फोटांवर स्फोट झाले. एका नामांकित कंपनीतील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार डेटोनेटर्स तयार करणाऱ्या अशा कंपन्यांमध्ये अगदी कामगारांच्या शरीरात निर्माण होणारी 'स्टॅटिक इलेक्ट्रीसिटी' किंवा काम करताना होणाऱ्या घर्षणातून निघणाऱ्या लहानशा ठिणगीतूनदेखील अपघात होऊ शकतो. त्यामुळे ही एक ठिणगी नेमकी कुठून आली याचे कारण शोधण्याचे मोठे आव्हान 'पेसो', 'डिश', एटीएस यांच्यासारख्या यंत्रणांसमोर आहे.
औद्योगिक स्फोटकांच्या निर्मितीत वापरले जाणारे डेटोनेटर्स तयार करताना 'क्रिम्पिंग' ही प्रक्रिया अत्यंत संवेदनशील आणि धोकादायक मानली जाते. या टप्प्यात थोडीशी चूक झाली तरी मोठा स्फोट होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्फोटक कारखान्यांमध्ये या प्रक्रियेदरम्यान विशेष काळजी घेणे आवश्यक मानले जाते. क्रिम्पिंग विभागात एकावेळी मर्यादित प्रमाणातच डेटोनेटर्स ठेवणे, पूर्णपणे स्वयंचलित यंत्रांचा वापर करणे आणि कामगारांना नियमित सुरक्षा प्रशिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष झाल्यास एका ठिणगीतूनदेखील मोठे स्फोट होऊ शकतात.
सुपरवायझरची चौकशी महत्त्वाची
प्रत्येक युनिटमध्ये सुपरवायझर होते. 'लोकमत'च्या हाती असलेल्या 'एसबीएल'च्या नियमावलीनुसार प्रत्येक कामगाराला कामासाठी वेगळे क्युबिकल होते. सगळ्यांना पीपीई किट घालणे व कामाचा टेबल स्वच्छ करणे अनिवार्य होते. शिवाय दर दिवशी कामाला सुरुवात करण्याअगोदर प्रत्येक मशीनचे अर्थिग कनेक्शन तपासणे गरजेचे होते. डमी शेलच्या माध्यमातून प्रत्येक क्युबिकलमध्ये १० किलो लोडसाठी १० सेकंद चाचणी करणे आवश्यक होते. सोबतच ०.६ मिमी गेजच्या माध्यमातून ब्लॉक टेस्ट करायची होती. जर यात किंचितदेखील फरक आढळला तर त्वरित प्रोडक्शन सुपरवायझरला कळविणे अनिवार्य होते. कामगारांनी या बाबी केल्या होत्या का हे सुपरवायझरच्या चौकशीतून समोर येऊ शकते.
नेमकी काय असते प्रक्रिया
डेटोनेटर तयार करताना सर्वप्रथम एका लहान धातूच्या नळीसारख्या शेलमध्ये संवेदनशील स्फोटक पदार्थ भरला जातो. त्यानंतर त्या शेलमध्ये वायर किंवा फ्यूज बसवला जातो. हा फ्यूज घट्ट बसावा आणि स्फोटक पदार्थ बाहेर पडू नये यासाठी शेलच्या तोंडाला विशेष यंत्राच्या साहाय्याने दाब देऊन बंद केले जाते. या प्रक्रियेला 'क्रिम्पिंग' असे म्हणतात.
विशेष बूट व अँटी स्टॅटिक कपडे होते का?
कामगारांच्या शरीरावर निर्माण होणारी स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीदेखील धोकादायक ठरू शकते. या विद्युतभारामुळे डेटोनेटरमध्ये प्रतिक्रिया होऊन स्फोट होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा कारखान्यांमध्ये अँटी-स्टॅटिक कपडे, विशेष बूट, नियंत्रित तापमान आणि सुरक्षित अंतर यासारखे अनेक सुरक्षा नियम पाळणे बंधनकारक असते. 'एसबीएल'मध्ये कामगारांना 'पीपीई' किट घालण्याबाबत इंग्रजीत लिहिण्यात आले होते. मात्र, त्याचे कितपत पालन झाले होते या दिशेनेदेखील चौकशी होण्याची आवश्यकता आहे.
दाब, घर्षणातून होऊ शकतो स्फोट
क्रिम्पिंग करताना शेलवर दाब दिला जात असल्यामुळे आत असलेल्या स्फोटक पदार्थावर अचानक ताण येतो. हा स्फोटक पदार्थ अत्यंत संवेदनशील असल्याने जास्त दाब, घर्षण किंवा अचानक निर्माण झालेली ठिणगी यामुळे तात्काळ स्फोट होऊ शकतो.काही वेळा मशीनचा दाब योग्य प्रमाणात नसणे, उपकरणांमध्ये बिघाड असणे किंवा कामगारांकडून झालेली छोटीशी चूकदेखील अपघाताला कारणीभूत ठरते.
Web Summary : Raulgaon's SBL factory blast, killing 19, is investigated for cause: human error or technical fault. Detonators were stored at the crimping unit, leading to explosions from a single spark. Static electricity or friction could be the source. Supervisor's testimony is vital to confirm safety protocols.
Web Summary : राऊलगढ़ की एसबीएल फैक्ट्री में विस्फोट, जिसमें 19 की मौत हो गई, के कारण की जांच की जा रही है: मानवीय त्रुटि या तकनीकी खराबी। डेटोनेटर क्रिम्पिंग इकाई में संग्रहीत किए गए थे, जिससे एक चिंगारी से विस्फोट हुए। स्थैतिक बिजली या घर्षण स्रोत हो सकता है। सुरक्षा प्रोटोकॉल की पुष्टि के लिए पर्यवेक्षक की गवाही महत्वपूर्ण है।