१३० ग्रामपंचायतींमध्ये झाली निवडणूक
४८५ मतदान केंद्रांवर निवडणूक
४८५ निवडणूक अधिकारी
१४५५ निवडणूक कर्मचारी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणूक काळात निवडणुकीच्या कामात नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना मान काही वेगळाच असतो. मात्र निवडणूक संपली की, त्यांच्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते. ही वस्तुस्थिती आहे.जिल्ह्यात ग्रामपंचायतची निवडणूक नुकतीच पार पडली. निकालही लागले. परंतु ही निवडणूक यशस्वी करण्यात ज्यांचा मोलाचा वाटा राहिला ते निवडणूक अधिकारी व कर्मचारी मात्र अजूनही मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत.
नागपूर जिल्ह्यात एकूण १३० ग्राम पंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. एकूण ४८५ मतदान केंद्रांवर या निवडणुका घेण्यात आल्या. यासाठी ४८५ निवडणूक अधिकारी व १४५५ कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. निवडणूक संपून आता बरेच दिवस झाले परंतु निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांचे मानधन मात्र अजूनही मिळालेले नाहीत.
बॉक्स
अधिकाऱ्यांना १३०० तर कर्मचाऱ्यांना ९०० रुपये मानधन
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षक व निवडणुकीसाठी मानधन दिले जाते. अधिकाऱ्यांना १३०० रुपये तर कर्मचाऱ्यांना ९०० रुपये याप्रमाणे मानधन दिले जाते. हे मानधन अजूनही मिळालेले नाही. २०१८ मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचेही मानधन अद्याप मिळाले नसल्याचे सांगितले जाते.
बॉक्स
प्रत्येक ग्रामपंचायतमागे ५० हजार रुपये
गाम विकास विभागाकडून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतमागे ५० हजार रुपये निवडणूक खर्च दिला जातो. यामध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मानधन, छपाई, स्टेशनरी, व इतर सर्व खर्च आला. सध्याची महागाई व ग्रामपंचायतीमधील मतदानाची संख्या पाहता इतक्या पैशात खर्च परवडत नाही. किमान प्रत्येक मतदान केंद्रासाठी २३ हजार रुपये खर्चाची गरज असल्याचे अधिकारी-कर्मचारी सांगतात.
कोट
निवडणूक अधिकारी-कर्मचाऱ्यांना मानधन मिळाले नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु निवडणुकीचे मानधन हे मागे पुढे होत असते. ते अधिकारी कर्मचाऱ्यांना मिळतेच. उशिरा का होईना पण ते मिळेल.
शिवनंदा लंगडापुरे
ग्रामपंचायत निवडणूक प्रमुख