लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : यवतमाळ येथील अवधूतवाडी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचे बांधकाम किती दिवसांत पूर्ण होईल, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हा पोलिस अधीक्षक व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना केली आहे. तसेच यावर येत्या १९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
यासंदर्भात दिगांबर पचगाडे यांची जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. २०१४ मध्ये तत्कालीन अवधूतवाडी पोलिसांनी गुन्हेगारांकडून देणगी गोळा केली आणि त्या रकमेतून सध्याच्या पोलिस ठाण्यात अवैध बांधकाम केले.
त्या बांधकामासाठी स्थानिक प्रशासनाची मंजुरीही घेतली नाही, असा आरोप या याचिकेत करण्यात आला होता. दरम्यान, उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांमुळे दोषी पोलिस कर्मचाऱ्यांवर आवश्यक कारवाई करण्यात आली. तसेच पोलिस ठाण्यासाठी नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. या इमारतीचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने हे निर्देश दिले.