सैयद मोबीन/लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खरे सांगायचे तर वृद्धाश्रम म्हणजे भारतीय सांस्कृतिक प्रवचनाला लागलेला एक काळा डाग आहे. जिथे मातृत्व-पितृत्वाचे महात्म्य गायले जाते, तेथे मुलांपासून वेगळे होत पालकांना वृद्धाश्रमाचा रस्ता धरावा लागतो, यापेक्षा दुसरे दुर्दैव नसायला हवे. मात्र, अशा दुर्दैवी स्थळातही नाते निर्माण होत असतात. त्याचे ताजे उदाहरण रविवारी बघता आले. सीताबर्डी येथील म्यूर मेमोरियल हॉस्पिटल येथे असलेल्या हेलन ओल्ड एज होम(वृद्धाश्रम) मध्ये मित्रत्वाचे बंध अनुभवता आले. दोन वर्षापूर्वी वृद्धाश्रमातून कुटुंबात परतलेले उमाजी आणि नत्थूजी आपल्या मित्रांना भेटण्यास पुन्हा वृद्धाश्रमात परतले.
उमाजी आणि नत्थूजी दोन वर्षापूर्वी कौटुंबिक विवादामुळे ओल्ड एज होममध्ये राहत होते. म्यूर मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक डॉ. विलास शेंडे आणि हेलन ओल्ड एज होमच्या प्रभारी डॉ. रजनी शेंडे यांच्या म्हणण्यानुसार ज्येष्ठ कुटुंबासोबत राहत असतील तर ती आदर्श कौटुंबिक स्थिती आहे. त्याच आदर्शाला वास्तवात उतरविण्यासाठी दोन वर्षापूर्वी उमाजी आणि नत्थूजीच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करण्यात आले आणि दोघांनाही त्यांच्या घरी पाठविण्यात आले.
उमाजी आणि नत्थूजी यांनी वृद्धाश्रमात तीन ते चार वर्षाचा काळ घालवला होता. त्यामुळे त्यांचे इथे बरेच समवयस्क मित्र बनले होते. दोन वर्षानंतर त्याच मित्रांच्या आठवणीने त्यांना पुन्हा वृद्धाश्रमापर्यंत ओढून आणले. मात्र, यावेळी ते कुटुंबीयांपासून वेगळे होत नाही तर आनंदाने आपल्या मित्रांना भेटण्यासाठी आले होते. ऑटोमोटिव्ह चौक, कामठी रोड आणि टिमकी येथे राहणारे उमाजी व नत्थूजी रविवारी सोबतच वृद्धाश्रमात पोहोचले आणि मित्रांची भेट घेतली.
आमच्यासाठी आनंदाची बाब
आम्ही २००८ पासून वृद्धाश्रम चालवतो. वृद्ध नागरिक आपल्या कुटुंबीयांसोबतच राहावे, असे आमचे प्रयत्न असतात. त्याच कारणाने येथे येणाऱ्या वृद्धांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करून, वृद्धांना त्यांच्या घरी पाठविण्याचे प्रयत्न असतात. दोन वर्षापूर्वी उमाजी आणि नत्थूजी यांना अशाच तऱ्हेने घरी पाठविण्यात आले. दोघही आज आम्हाला आणि आपल्या मित्रांना भेटण्यास वृद्धाश्रमात आले, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. आमच्याकडून त्यांना देण्यात आलेल्या सेवाच त्यांना आम्हास भेटण्यास पुरेशा ठरल्या. हे आमच्या कार्याचे प्रमाण आहे.
- डॉ. रजनी शेंडे, प्रभारी - हेलन ओल्ड एज होम
......