लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्रामीण भागातील पाचवीपासूनच्या शाळा सुरू झाल्या असून फेब्रुवारीत शहरातील शाळांनादेखील सुरूवात होईल. शालेय शिक्षण प्रत्यक्ष वर्गखोल्यांत सुरू झाले असले तरी पदवी व पदव्युत्तर शिक्षणाबाबत अद्यापही ‘कोरोना’ची दहशत दिसून येत आहे. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश झाले असूनदेखील प्रत्यक्ष वर्गांना कधी सुरूवात होणार असा प्रश्न विद्यार्थी व शिक्षक दोघांकडूनही विचारला जात आहे.
‘लॉकडाऊन’ लागू झाल्यापासून पदवीपासूनचे शिक्षण ‘ऑनलाईन’ माध्यमातूनच होत आहे. परीक्षादेखील ‘मोबाईल अॅप’च्या माध्यमातून घेण्यात आल्या. आता ‘कोरोना’चा प्रभाव ओसरताना दिसून येत आहे. असे असले तरी राज्य शासनाने अद्यापपर्यंत महाविद्यालये सुरू करण्याबाबत कुठलीही पावले उचललेली नाही. पदवी व पदव्युत्तरच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेणाऱ्यांसाठी महाविद्यालय किंवा विभाग नवीन राहणार आहे. त्यामुळे शिक्षकांशी ‘कनेक्ट’ प्रस्थापित करण्यासाठी प्रत्यक्ष वर्गांची आवश्यकता असल्याचा विद्यार्थ्यांचा सूर आहे. दुसरीकडे शिक्षकांचेदेखील असेच म्हणणे आहे. या स्थितीत आता सरकारच्या निर्देशांची प्रतीक्षा करायची की ‘ऑनलाईन’ वर्गांच्या माध्यमातूनच अध्ययन सुरू करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे.
‘इंडक्शन-ओरिएंटेशन’देखील ‘ऑनलाईन’
सर्वसाधारणत: प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांत ‘इंडक्शन-ओरिएंटेशन’ सत्राचे आयोजन करण्यात येते. महाविद्यालय किंवा विभागात विद्यार्थी रुळावे, त्यांची ओळख व्हावी हा त्यामागचा उद्देश असतो. मात्र प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याबाबत कुठलेही निर्देश नसल्याने ‘ओरिएंटेशन’देखील ‘ऑनलाईन’ घेण्याची तयारी सुरू झाली आहे. मात्र अशाप्रकारच्या सत्रामुळे आवश्यक उद्देश साध्य करता येणार नाही असे मत एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केले.