ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना त्रास : उपलब्ध असूनही होत नाही उपयोग
नागपूर : ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवासी एसटी बसने प्रवास करतात. परंतु, बसस्थानकावर आल्यानंतर त्यांना चालताना त्रास होतो. त्यासाठी व्हील चेअरची व्यवस्था असणे आवश्यक आहे. परंतु, गणेशपेठ बसस्थानकावर व्हील चेअर असूनही त्याचा दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना लाभ होत नसल्याची स्थिती आहे.
नागपूर शहरातील मध्यवर्ती गणेशपेठ बसस्थानकावर हजारो प्रवासी प्रवास करण्यासाठी येतात. बसस्थानकावर दिव्यांग प्रवाशांसाठी रॅम्पची व्यवस्था आहे. परंतु बसपर्यंत जाण्यासाठी प्रवाशांना व्हील चेअर उपलब्ध करून देण्यात येत नाही. बसस्थानकावर व्हील चेअर उपलब्ध आहे. परंतु त्याबाबत बसस्थानकावर व्हील चेअर उपलब्ध असल्याची कुठलीच सूचना लावण्यात आलेली नाही. त्यामुळे बस स्थानकावर व्हील चेअर असल्याची बाब कुणालाच माहिती नाही. यामुळे दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत आहे. एसटी महामंडळाच्या अधिकाºयांनी त्याबाबत सूचना लावून ध्वनी क्षेपकाच्या माध्यमातून व्हील चेअर उपलब्ध असल्याची घोषणा करण्याची गरज आहे.
............
बसस्थानकावरून ये-जा करणाऱ्या बसेसची संख्या : ७५०
एकूण प्रवाशांची संख्या : २५ हजार
चौकशी कक्षात व्हील चेअर धुळखात
गणेशपेठ बसस्थानकावर व्हील चेअर चौकशी कक्षात धुळखात पडलेली आहे. बसस्थानकावर व्हील चेअर असूनही ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवाशांना त्याचा उपयोग होताना दिसत नाही. त्यामुळे एसटी महामंडळाने व्हील चेअर उपलब्ध असल्याची सूचना दर्शनी भागात लावण्याची गरज आहे. तसेच ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून घोषणा केल्यास दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना व्हील चेअरबाबत माहिती होईल.
..........
व्हील चेअरबाबत माहिती नाही
बसस्थानकावर व्हील चेअर उपलब्ध असल्याची बाब माहिती नाही. चालताना त्रास होत असल्यामुळे व्हील चेअर असल्याची बाब माहित असती तर तिचा वापर केला असता. एसटी महामंडळाने दिव्यांगांच्या सुविधेसाठी व्हील चेअर उपलब्ध असल्याची सूचना लावणे गरजेचे आहे.
-मो. शाहरुख, दिव्यांग प्रवासी
ज्येष्ठ नागरिकांना हवी व्हील चेअर
बसस्थानकावर आल्यानंतर बसपर्यंत जाण्यासाठी चालताना त्रास होतो. व्हील चेअर मिळाल्यास माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना सुविधा होईल. त्यामुळे व्हील चेअर दर्शनी भागात ठेवल्यास त्याचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना होईल.
-रामराव जाधव, ज्येष्ठ नागरिक
मागणीनुसार व्हील चेअर देण्यात येते
गणेशपेठ बसस्थानकार ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवाशांसाठी व्हील चेअर उपलब्ध आहे. प्रवाशांनी मागणी केल्यास व्हील चेअर उपलब्ध करून देण्यात येते.
-अनिल आमनेरकर, आगार व्यवस्थापक, गणेशपेठ
...........