योगेश पांडे
नागपूर : नागपुरातील गुन्हेगारी घटनांची चर्चा राज्यभर होते. राजकीय विरोधकांकडून नागपूर ‘क्राईम कॅपिटल’ झाल्याचेदेखील आरोप करण्यात येतात. गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचे मोठे आव्हान नागपूर पोलिसांसमोर आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच पोलिस अधिकारी, कर्मचारी दिसले की गुन्हेगारांमध्ये वचक बसावा, यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पोलिस चौक्यांची निर्मिती करून तेथे अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र शहरातील काही पोलिस चौक्या नावालाच असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. काही पोलिस चौक्यांचे दरवाजे बहुतांश वेळा बंदच दिसतात. त्यामुळे नागरिकांनी किरकोळ तक्रारी किंवा समस्यांसाठी प्रत्येक वेळी थेट पोलिस ठाणे गाठावे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलिस ठाण्याचे अंतर जास्त असल्याने नागरिकांना त्यांच्या किरकोळ तक्रारी या चौकीत जाऊन मांडता याव्यात, त्यांना तत्काळ मदत मिळावी, हादेखील पोलिस चौक्यांच्या स्थापनेमागील हेतू आहे. नागपुरात २५ हून अधिक पोलिस चौक्या आहेत. यातील बहुतेक पोलिस चौक्या या बंदोबस्त ठेवण्यासाठीच प्रासंगिक वापरल्या जातात. शहरात होणाऱ्या चोऱ्या, लूटमारीसारख्या घटनांच्या तक्रारी देण्यासाठी चौक्या सुरू कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे. काही पोलिस चौक्यांना बहुतांश वेळा कुलूप असते. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
२४ तास चौकी उघडी असावी
नागरिकांना सुरक्षिततेची भावना कायम राहावी. यासाठी पोलिस चौकी असणे गरजेचे आहे; मात्र शहरात चौकीच कार्यरत नसल्याने रात्री-अपरात्री काही झाल्यास पोलिस चौकी २४ तास उघडी असावी, अशी अपेक्षा आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहे.
पोलिस ठाण्यांसोबत चौक्यादेखील वाढवाव्या
पूर्व नागपुरात काही वस्त्या गुन्हेगारी कारवायांसाठी कुख्यात आहेत. पूर्व नागपूरचा विस्तार पाहता आणखी दोन ते तीन पोलिस ठाणे व पोलिस चौक्या वाढविण्याची गरज असल्याची मागणी तेथील आमदार कृष्णा खोपडे यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.
या चौक्या नावालाच
‘लोकमत’च्या चमूने शहरातील काही पोलिस चौक्यांची पाहणी केली. यशवंत स्टेडियमजवळील पोलिस चौकीला भर सायंकाळी कुलूप होते. ही पोलिस चौकी बहुतांश वेळा बंदच असल्याची माहिती तेथील दुकानदारांनी दिली. तर महाल येथील चिटणवीसपुरा येथील पोलिस चौकीलादेखील कुलूप होते. हा भाग सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील मानला जातो. मात्र तरीदेखील कुणीच नसल्याचे दिसून आले.
दोन महिन्यांपासून चौकीला कुलूपच
नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील स्वतंत्रनगर येथे पोलिस चौकी उभारण्यात आली आहे. मात्र या पोलिस चौकीला कुलूपच होते. मागील दोन महिन्यांपासून येथे कुणीच कर्मचारी भटकले नाही व चौकीला कुलूपच असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
चौकीत सुविधांचा अभाव
शहरातील अनेक भागातील पोलिस चौकी सुरू असतात. मात्र या चौकींची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. पोलिस कर्मचाऱ्यांना कसे तरी तेथे बसावे लागते. काही ठिकाणी पावसाळ्यात मोठा त्रास होतो. ही दुरवस्था दूर करण्यासाठी प्रशासनाकडून ठोस प्रयत्नांची आवश्यकता आहे.