खापरखेडा केंद्र चर्चेत : मर्जीतल्या लोकांना मिळते कंत्राटखापरखेडा : स्थानिक औष्णिक विद्युत केंद्रामागील शुक्लकाष्ट सुटण्याची काहीच चिन्हे दिसत नाही. आधी लाच प्रकरण, अधिकाऱ्यांचे निलंबन, बदली, त्यानंतर निविदा घोटाळा उघडकीस आल्यानंतर उपमुख्य अभियंत्याने पदाचा दुरुपयोग करीत मर्जीतील व्यक्तीस कंत्राट देण्यामुळे आता पुन्हा एकदा खापरखेडा वीज केंद्र चर्चेत आले आहे. या प्रकारामुळे स्थानिक कंत्राटदारांमध्ये प्रचंड रोष असून भडका उडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे असे प्रकार सुरू असताना सारवासारव करण्यासाठी महानिर्मितीकडून जोरकस प्रयत्न चालविले जात आहे. खापरखेडा वीज केंद्रात उपमुख्य अभियंता म्हणून मनोहर खांडेकर हे कार्यरत आहे. त्यांनी हा सर्व प्रकार केला. त्यांच्या मुलाचा मित्र नितेश बागडे याचे माही एन्टरप्रायजेस व राहुल मेश्राम याचे राहुल इलेक्ट्रिकल नावाने फर्म असून नियमाला बाजूला सारत या दोन्ही फर्मला कंत्राट देण्याचे काम खांडेकर यांनी केले. उपमुख्य अभियंत्यांना तीन लाखाच्या आत कोटेशन व ७५ हजार रुपयांपर्यंत कन्फरमेंट्री स्वरुपात एजरजन्सी कामे देण्याचे अधिकार दिले आहे. असे असताना उपमुख्य अभियंता खांडेकर यांनी त्यांच्या मुलाचा मित्र नितेश बागडे याच्या एजंसीला एएचपी, बॉयलर मेन्टनन्स, सिव्हिल मेन्टनन्स व इतर लाखो रुपये किमतीची कामे मिळवून दिली. याशिवाय ओएस विभागातून ४४५०६ क्रमांकाची पेंटिंगची (इनक्वायरी) कामे काढण्यात आली. या कामासाठी अनेकांनी स्पर्धा केली. ते कंत्राट मिळविण्यासाठी आठ कंत्राटदार स्पर्धेत उतरले. त्यात साहील फ्रिजिंग वर्क्स या कंपनीने सदर कामासाठी २० टक्के दर टाकल्याने सदर काम हे साहील फ्रिजिंग वर्क्सला मिळाले. परंतु ते काम रद्द करण्याचे आदेश उपमुख्य अभियंत्यांनी काढल्याची माहिती आहे. उपमुख्य अभियंता खांडेकर हे पदाचा दुरुपयोग करून मर्जीतल्या व्यक्तीला लाभ देत असल्याने स्थानिक कंत्राटदारांमध्ये प्रचंड रोष आहे. यामुळे कंत्राटदारांनी आंदोलनाची तयारी चालविली आहे. नेहमी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असलेले खापरखेडा वीज केंद्र आता या नवीन घोटाळ्यामुळे प्रसिद्धीझोतात आले आहे. (प्रतिनिधी)अधिकारी म्हणतात...खापरखेडा वीज केंद्रात सुरू असलेल्या प्रकाराबाबत मुख्य अभियंता राजकुमार तासकर यांच्याशी संपर्क साधला असता ‘सदर प्रकार गंभीर असून यासंदर्भात चौकशी करू’ असे त्यांनी सांगितले. तर उपमुख्य अभियंता मनोहर खांडेकर यांच्याशी शुक्रवारी मोबाईलहून संपर्क केला असता त्यांनी बोलणे टाळले. सोमवारी (दि. २७) त्यांना बऱ्याचदा संपर्क केल्यावर त्यांनी मोबाईल रिसिव्ह केला नाही. विशेष म्हणजे, मुख्य अभियंता तासकर यांनी पदभार स्वीकारताच अनेक गंभीर प्रकार उघडकीस येत आहे. त्यामुळे आता ते या प्रकाराबाबत काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.
वीज केंद्रात चाललंय काय?
By admin | Updated: February 28, 2017 02:06 IST