समान निधीवाटपाने अन्याय : अविकसित भागाचा कसा होणार विकासनागपूर : शहराच्या काही भागाचा विकास झाला आहे तर शहरालगतच्या भागाचा अद्याप विकास झालेला नाही. या परिरसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना अद्याप मूलभूत सुविधा मिळत नाही. या भागात विकास कामांची गरज आहे. परंतु मनपातील सर्व नगरसेवकांना समान विकास निधी दिला जातो. यातून अविकसित भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा कशा मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरात ७२ प्रभाग असून १५० नगरसेवक आहेत. यात पाच स्वीकृत सदस्यांचा समावेश आहे. सर्व नगरसेवकांना प्रभागातील विकास कामासाठी वर्षाला १७.५० लाखाचा निधी दिला जातो. विकसित भागात मूलभूत सुविधांची समस्या नाही. परंतु पाच लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरालगतच्या १२ ते १४ प्रभागात पाणीपुरवठा, रस्ते, पथदिवे, गडरलाईन अशा मूलभूत सुविधा नाही. त्यामुळे या प्रभागातील विकास कामे नगरसेवकांच्या निधीतून पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे विकास निधीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी या भागातील नगरसेवकांनी केली आहे. पावसाळी नाल्या व गडरलाईन नसल्याने जोराचा पाऊ स झाला की या भागातील वस्त्यात पाणी शिरते. अनेक वस्त्यात रस्ते नसल्याने चिखलातून जावे लागते. नळाद्वारे पाणीपुरवठा होत नसल्याने लोकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते.पावसाळ्याच्या दिवसात दूषित पाण्यामुळे आजार होण्याचा धोका असतो. डेंग्यू, मलेरियाचा व साथरोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने या वस्त्यात आढळून येतो. परंतु पुरेसा विकास निधी नसल्याने नगरसेवकांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. (प्रतिनिधी)
नागरिकांना कशा मिळणार मूलभूत सुविधा?
By admin | Updated: July 23, 2015 03:02 IST