उमरेड : विविध सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळे तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची दमदार फळी उमरेड नगरीची शान आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेकांनी मदतकार्य करीत सेवाभाव दाखविला. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अत्यंत कठीण परिस्थितीत पुन्हा सेवेकरी उमरेडकरांचा मदतीचा ओघ सुरू झाला आहे. व्हेंटिलेटर, भोजन, नि:शुल्क रुग्णवाहिका, रुग्णांना दूध, सीटी स्कॅनसाठी नागपूर येथे वाहनांची सुविधा अशा विविध स्वरूपांतील मदतकार्य आता सुरू झाले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, उमरेड नगरच्या वतीने तालुका संघचालक अरविंद हजारे, नगर संघचालक अनिल गोविंदानी यांनी उमरेडच्या कोविड सेंटरला मिनी व्हेंटिलेटर प्रदान केले. लागलीच हे व्हेंटिलेटर रुग्णांच्या कामातही आले. ३० वर्षांपासून सातत्याने सेवा प्रदान करणाऱ्या जेसीआय उमरेड या संस्थेने कोरोनाबाधित व्यक्ती आणि कुटुंबीयांसाठी घरपोच नि:शुल्क भोजन सुविधा सुरू केली आहे. संस्थापक डॉ. शशिकांत जयस्वाल, अध्यक्ष अतुल खांडेकर यांच्या मार्गदर्शनात गरजूंनी अमोल मौदेकर, अर्जुन गिरडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने केले गेले आहे.
स्व. रणधीरसिंह भदोरिया मित्र मंच व छत्रपती क्रीडा मंडळाच्या वतीने रुग्णांसाठी दुधाची व्यवस्था सुरू करण्यात आल्याची माहिती राजेश बांदरे यांनी दिली. सुरेश ठक्कर, मनीष शिंगणे, सारंग डहाके, अंकित दुबे, रोशन झाडे, विक्रम जोशी यांच्या वतीने नागपूर येथे सीटी स्कॅनसाठी नि:शुल्क वाहनाची व्यवस्था सुरू केली आहे. सुभाष गुप्ता, सतीश गुप्ता आणि डॉ. विपुल गुप्ता यांच्या वतीने कोविड सेंटरला लागणारी महत्त्वपूर्ण औषधे देण्यात आली. या विविध संस्थांचे आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
नि:शुल्क रुग्णवाहिकाही
परिसरात कुटुंबातील व्यक्ती कोरोनाबाधित झाल्यास अनेकांना कोविड सेंटरमध्ये जाण्यास, कोरोना चाचणीसाठी वेळीच पोहोचण्यास वाहने उपलब्ध होत नाही. अशा कठीण परिस्थितीत असलेल्यांना नि:शुल्क रुग्णवाहिका सेवा शिवस्नेह गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. उमरेड, भिवापूर आणि कुही परिसरातील समस्याग्रस्त नागरिकांसाठी ही सेवा असून, सामाजिक कार्यकर्ते संतोष महाजन यांनी स्वत:चे वाहन संस्थेसाठी दिले. चालक, इंधन आणि इतर खर्च संस्था उचलणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रशांत जयस्वाल यांनी दिली.