रणजी जेतेपदाच्या यशाचे विदर्भाने केले सहर्ष स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 10:52 AM2018-01-02T10:52:12+5:302018-01-02T10:55:50+5:30

 विदर्भ संघाने सोमवारी चौथ्या दिवशी जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या जेतेपदामुळे विदर्भाच्या क्रिकेट वर्तुळात नवा उत्साह संचारला.

Welcome to Vidarbha for the success of the Ranji Trophy | रणजी जेतेपदाच्या यशाचे विदर्भाने केले सहर्ष स्वागत

रणजी जेतेपदाच्या यशाचे विदर्भाने केले सहर्ष स्वागत

googlenewsNext
ठळक मुद्देशहरात आतषबाजी मिठाई वाटून साजरा केला आनंद

आॅनलाईन लोकमत
नागपूर : फैज फझलच्या नेतृत्वाखालील विदर्भ संघाने सोमवारी इतिहास घडविताना संघाला रणजी चषक पटकावून दिला. अंतिम लढतीत बलाढ्य दिल्ली संघाविरुद्ध पहिल्या दिवसापासून वर्चस्व गाजवणाऱ्या विदर्भ संघाने सोमवारी चौथ्या दिवशी जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या जेतेपदामुळे विदर्भाच्या क्रिकेट वर्तुळात नवा उत्साह संचारला. आज शंकरनगर, व्हीसीए सिव्हिल लाईन्स परिसर, गोकुळपेठ चौक यासारख्या शहरातील गजबजलेल्या परिसरात चाहत्यांनी फटाके फोडून विजयाचा आनंद साजरा केला. ‘चॅम्पियन’ एका रात्रीत घडत नसतात. त्यासाठी सुरुवातीपासून मेहनत घ्यावी लागते. आज विदर्भ संघाच्या यशाने त्याची प्रचिती आली. विदर्भाने ६० वर्षानंतर जेतेपदावर नाव कोरताना देशातील क्रिकेट वर्तुळाला दखल घेण्यास भाग पाडले.

अविश्वसनीय कामगिरी
विदर्भ क्रिकेट संघ कधी रणजी करंडक पटकावेल, हे दिवास्वप्नच होते. मात्र, या संघाने ते स्वप्न पूर्ण करून दाखवीत विदर्भ क्रिकेट संघही ही कामगिरी करून दाखवू शकतो, हे सिद्ध केले आहे. एक माजी खेळाडू म्हणून रणजी करंडक विदर्भ संघाच्या हाती कधी बघायला मिळेल का, याची शक्यताच वाटत नव्हती. मात्र, या तरुण खेळाडूंनी उत्तम सांघिक खेळ करीत ही कामगिरी करून दाखविली. हा क्षण पाहण्यासाठी ६० वर्षे वाट पाहावी लागली. त्यानंतर हा क्षण आल्याने नक्कीच तो मोठा आहे, याचे सर्व श्रेय खेळाडू व सपोर्ट स्टाफला आहे. त्यांनी चांगला खेळ केला. त्यामुळे हा सर्वांसाठीच आनंदाचा क्षण आहे.
-प्रकाश सहस्रबुद्धे, विदर्भ क्रिकेट संघाचे माजी कर्णधार


ऐतिहासिक क्षण
विदर्भ क्रिकेटच्या प्रत्येक आजी-माजी खेळाडूंचे हे स्वप्न सध्याच्या संघाने पूर्ण करून दाखविले. ज्याप्रकारे संघ यंदाच्या हंगामात खेळला ती खरोखरच ती खेळी अद्वितीय आहे. संघाचे हे विजेतेपद हा प्रत्येकासाठी ऐतिहासिक क्षण आहे. फैज फजलच्या नेतृत्वातील संघाने करून दाखविलेली कामगिरी खरोखर मोठी आहे. यापूर्वी विदर्भ क्रिकेटकडे शुद्र नजरेने बघण्यात येत होते. मात्र, आता संघाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलेल. विदर्भ संघाच्या कामगिरीची दखल आता सर्वांनाच घ्यावी लागणार आहे. यात मोठे श्रेय व्हीसीएचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर, सध्याचे उपाध्यक्ष प्रशांत वैद्य, अद्वैत मनोहर यांचेही आहे. या सर्वांनी विदर्भ क्रिकेटच्या विकासासाठी अनेक चांगल्या योजना राबविल्या. त्याचेच हे फळ आहे.
-प्रवीण हिंगणीकर, माजी रणजीपटू

कौतुकास्पद कामगिरी
विदर्भ क्रिकेट संघातील नवख्या व अनुभवी खेळाडूंनी यंदाच्या हंगामात रणजी करंडकात जी कामगिरी करून दाखविली ती खरोखरच कौतुकास्पद होती. हा विजय विदर्भातील क्रिकेटपटूंची मानसिकताच बदलविणारी नाही तर त्यांच्याकडे इतर संघांचा जो आतापर्यंत बघण्याचा दृष्टिकोन होता तोसुद्धा बदलणार आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी या क्रिकेटपटूंनी वैदर्भीय क्रिकेटप्रेमींना दिलेले हे गिफ्ट आहे. पण, केवळ या विजेतेपदावर समाधान मानून चालणार नाही. आता पुढेही कामगिरीत हेच सातत्य कायम ठेवण्याची मोठी जबाबदारी संघावर आली आहे. त्यामुळे आता संघाला नियमितपणे रणजी करंडक स्पर्धेची उपांत्यपूर्व किंवा उपांत्य फेरी गाठावी लागणार आहे. संघाचे या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अभिनंदन.
-सुहास फडकर, माजी कर्णधार विदर्भ संघ

जबाबदारी वाढली
रणजी करंडकाचे विजेतेपद, तेसुद्धा इतक्या प्रदीर्घ वर्षांच्या कालावधीनंतर ही खरोखरच एक स्वप्नपूर्ती आहे. यापूर्वी उपांत्यपूर्व फेरी, एकदिवसीय स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्याची कामगिरी संघाने केली होती. मात्र, रणजी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद ही खऱ्या अर्थाने मोठी अचिव्हमेंट आहे. अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले. पण, आता या कामगिरीसोबतच जबाबदारीही वाढली आहे. आता संघाला केवळ यावर समाधानी होऊन चालणार नाही तर पुढेही यात सातत्य ठेवावे लागणार आहे. प्रत्येक वर्षी अंतिम उपांत्य फेरी, अंतिम फेरी कशी गाठता येईल यासाठी असाच खेळ करावा लागणार आहे तरच संघाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. पण, विदर्भाच्या या कामगिरीची आता प्रत्येकालाच दखल घ्यावी लागणार आहे, हे नक्की.
-प्रीतम गंधे, माजी कर्णधार, विदर्भ संघ


खरे चॅम्पियन्स
यंदाच्या हंगामात विदर्भ क्रिकेट संघाने जी कामगिरी केली व अंतिम फेरीत दिल्लीविरुद्ध जसा खेळ केला त्यातून विदर्भ संघ हाच विजेतेपदाचा खरा दावेदार होता, हेच दिसून येते. खरोखरच विदर्भ क्रिकेटकरिता हा क्षण अत्यंत मोठा आहे. यंदाच्या हंगामात गुरबानी, वाडकरसारखे खेळाडू पुढे आले आहेत. तर वासीम जाफरसारख्या प्रदीर्घ अनुभव असलेल्या खेळाडूच्या मार्गदर्शनामुळे या सर्व टॅलेंटेड खेळाडूंना ही कामगिरी करता आली आहे. ही खरोखरच अभिमानाची बाब आहे. कर्णधार फैज फजल, प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांची भूमिकाही विसरून चालणार नाही. प्रत्येक युवा खेळाडूंवर दाखविलेला विश्वास यामुळे हे शक्य झाले. खऱ्या अर्थाने आपण चॅम्पियन आहोत.
-हेमंत वसू, माजी कर्णधार, विदर्भ संघ

खूप मोठा क्षण
क्रिकेटपटू म्हणून विदर्भाकडून खेळताना रणजी करंडकाचे विजेतेपद पटकाविण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. अखेर हे स्वप्न पूर्ण झाल्याचा मोठा आनंद आहे. संघातील युवा व अनुभवी खेळाडूंनी संपूर्ण हंगामात अनेक मोठ्या संघांना पराभूत करीत ही कामगिरी करून दाखविली. या विजयासाठी तब्बल ६० वर्षे लागली. त्यामुळे हा खूप मोठा क्षण आहे.
-अमित देशपांडे, माजी रणजीपटू

फैजच्या कामगिरीचा अभिमान
विदर्भाच्या जेतेपदात फैजच्या नेतृत्वगुणांचा मोलाचा वाटा राहिला. मी त्याला फार पूर्वी २४ नंबरचा टी-शर्ट घालण्याचा सल्ला दिला होता. फैजमध्ये सकारात्मकवृत्ती असल्यामुळे तो यंदा यशस्वी होईल. विदर्भाला करंकड जिंकून देईल, असे भाकीत आधीच केले होते. मेहनतीला नशिबाची जोड लाभल्याने तो यशस्वी ठरला. रजनीश गुरबानी याच्यात आंतरराष्टय स्तरावर खेळण्याची क्षमता आहे. गोलंदाजीतील भेदकतेच्या बळावर तो लवकरच भारतीय संघात पदार्पण करणार, हे निश्चित. चॅम्पियन विदर्भ संघाचा सार्थ अभिमान वाटतो.
- नरेंद्र बुंदे, क्रिकेटचे भाष्यकार आणि ज्योतिषी

मनसे अभिनंदन फैज अ‍ॅन्ड कंपनी
अखेर दिल्लीला नमवून रणजी करंडक नागपुरात आणल्याबद्दल, कर्णधार फैजसह सर्व सहकारी खेळाडू आणि कोच यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अभिनंदन. ही कामगिरी अशीच सुरू राहील, अशी अपेक्षा.
- हेमंत गडकरी,
विदर्भ प्रमुख मनसे.

Web Title: Welcome to Vidarbha for the success of the Ranji Trophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.