तेजसिंग सावजी
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : शहरातील महात्मा गांधी चाैकापासून तर हाेळी चाैकापर्यंतच्या राेडलगत दाेन्ही बाजूला आठवडी बाजारातील दुकाने थाटली जातात. विशेष म्हणजे, गडकरी चाैक-महात्मा गांंधी चाैक-हाेळी चाैक हा मार्ग सतत वर्दळीचा आहे. दुकाने आणि त्याच्याजवळ उभ्या राहणाऱ्या ग्राहकांमुळे या मार्गावर प्रचंड गर्दी हाेती. या गर्दीतून पायी चालणे अवघड जात असून, ही बाब अपघाताला कारणीभूत ठरत आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आराेप नागरिकांनी केला आहे.
सावनेर शहरात दर शुक्रवारी आठवडी बाजार भरताे. या बाजारात इतर तालुक्यासह मध्य प्रदेशातील विक्रेते व शेतकरी त्यांची दुकाने थाटत असून, ग्रामीण भागातील ग्राहकही माेठ्या प्रमाणात खरेदीसाठी येतात. शहराच्या मध्य भागातून नागपूर-छिंदवाडा मार्ग गेला आहे. विक्रेते त्यांची दुकाने या मार्गावरील बसस्थानक परिसरापासून लावायला सुरुवात करतात. बसस्थानक ते महात्मा गांधी चाैकापर्यंत दुकानांची संख्या तुरळक असते. मात्र, महात्मा गांधी चाैकापासून ते हाेळी चाैकापर्यंत दुकानांचे प्रमाण अधिक असते. कळमेश्वर व काटाेलला जाण्यासाठी या मार्गावरून जावे लागते.
हा मार्ग आधीच अरुंद आहे. त्यातच दुकाने थाटली जात असल्याने तसेच दुकानांजवळ ग्राहक खरेदीसाठी गर्दी करीत असल्याने या मार्गावरून व्यवस्थित पायी चालता येत नाही. या गर्दीत महिला व तरुणींची माेठी गैरसाेय हाेते. विशेष, म्हणजे, याच मार्गालगत विविध वस्तूंची दुकानेदखील आहेत. रहदारीच्या दृष्टीने विक्रेत्यांना या राेडलगत दुकाने थाटण्यास प्रतिबंध केल्यास ते भांडणे करतात. त्यामुळे कुणीही त्यांना प्रतिबंध करण्याच्या भरीस पडत नाही. ही समस्या दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करीत असल्याने प्रशासनाने ती साेडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह दुकानदारांनी केली आहे.
....
चाेरीचे प्रमाण वाढले
बाजारातील गर्दी चाेरट्यांच्या पथ्यावर पडणारी आहे. चाेरटे व खिसेकापू गर्दीचा फायदा घेत पुरुषांच्या खिशातील माेबाईल व राेख रक्कम तसेच महिलांच्या गळ्यातील दागिने चाेरून नेतात. या बाजारात प्रत्येक शुक्रवारी किमान १५ ते २० माेबाईल हॅण्डसेट व महिलांच्या पर्स चाेरीला जातात. यातील बहुतांश नागरिक माेबाईल किंवा रक्कम हरवली असे समजून पाेलिसात तक्रारही नाेंदवित नाही. पाेलीस माेबाईल अथवा रक्कम चाेरीला गेल्याची तक्रार नाेंदवून घेण्याऐवजी ती हरवल्याची तक्रार नाेंदवितात, असेही काहींनी सांगितले. त्यामुळे चाेरीच्या घटनांना आळा घालणे कठीण झाले आहे.
....
नगर परिषद प्रशासनाकडे आठवडी बाजारासाठी याेग्य जागा नाही. त्यामुळे ही समस्या साेडविण्यास अडचणी येत आहेत. पालिकेकडे सध्या उपलब्ध असलेल्या जागेवर आठवडी बाजार स्थानांतरीत करण्याबाबत विचार सुरू आहे. याबाबत लवकरच धाेरणात्मक निर्णय घेतला जाईल.
- रवींद्र भेलावे, मुध्याधिकारी,
नगर परिषद, सावनेर.