लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात एका बाजूला रुग्णांची संख्या प्रचंड असताना, दुसऱ्या बाजूला रुग्णालयातील डिप्लोमेट नॅशनल बोर्ड (डीएनबी) चे २६ डॉक्टरांना जानेवारीपासून वेतन मिळालेले नाही. यामुळे संतप्त डॉक्टरांनी मंगळवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे, ज्यामुळे आरोग्यसेवेवर ताण वाढला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, काही महिन्यांपूर्वी इंधनाचा निधी थकल्याने रुग्णवाहिकाही बंद पडल्या होत्या आणि अद्यापही पेट्रोल पंपाचे पूर्ण बिल मिळालेले नाही, त्यामुळे रुग्णवाहिका कधीही ठप्प पडण्याची शक्यता आहे.
एकूणच डागा रुग्णालयात आरोग्यसेवेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. डागा रुग्णालयातील २६ डीएनबी डॉक्टरांना मागील सहा महिन्यांपासून, म्हणजेच जानेवारीपासून वेतन मिळालेले नाही. पदव्युत्तर वैद्यकीय पदवीधारक असलेले हे डॉक्टर रुग्णालयाच्या दैनंदिन कामात महत्त्वाची भूमिका बजावतात. वेतनाअभावी संतापलेल्या डॉक्टरांनी सोमवारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीलीप मडावी यांना कामबंद आंदोलनाचे पत्र दिले आणि मंगळवारपासून आंदोलनाला सुरुवात केली. आज डीएनबी डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे कार्यरत डॉक्टरांवर कामाचा प्रचंड ताण आल्याचे चित्र आहे. प्रशासनाने जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांचे वेतन देण्याची तयारी दर्शवली असली तरी, डॉक्टर मागील सहा महिन्यांचे वेतन एकत्र देण्याच्या मागणीवर ठाम आहेत.
रुग्णसेवेवर परिणामडागा रुग्णालयात दररोज सरासरी ४० हून अधिक प्रसूती होतात, तर ३५० हून अधिक महिला रुग्ण दाखल असतात. याशिवाय, बालरोग दक्षता विभागातही २५ हून अधिक रुग्ण उपचाराखाली असतात. या प्रचंड रुग्णसंख्येमुळे डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांवर आधीच कामाचा ताण असतो. त्यात 'डीएनबी' डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनामुळे रुग्णसेवेवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रुग्णवाहिकाही अजूनही संकटातजून महिन्यात पेट्रोल पंपाचे जवळपास १० लाखांचे बिल थकल्याने डागा रुग्णालयातील सहा रुग्णवाहिका तब्बल दोन आठवडे बंद होत्या. 'लोकमत'ने हे वृत्त लावून धरल्यानंतर आरोग्य उपसंचालक कार्यालयाने तात्पुरती सोय म्हणून २ लाख २० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आणि रुग्णवाहिका पुन्हा सुरू झाल्या. मात्र, पेट्रोल पंप चालकाला अजूनही पूर्ण निधी मिळालेला नाही, त्यामुळे रुग्णवाहिका कधीही पुन्हा बंद पडण्याची शक्यता आहे. एकीकडे रुग्णवाहिकांच्या निधीचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नसताना, आता डॉक्टरांच्या वेतनावर गदा आल्याने आरोग्य विभागात नेमके काय सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.