बुटीबोरी एमआयडीसीत जलप्रदूषण घटणार, सांडपाण्याचा प्रश्न सुटणार

By योगेश पांडे | Published: November 1, 2023 08:52 PM2023-11-01T20:52:18+5:302023-11-01T20:52:40+5:30

‘नीरी’तर्फे उभारलेला ‘एसटीपी’चे कार्यान्वित

Water pollution will be reduced in Butibori MIDC, sewage problem will be solved | बुटीबोरी एमआयडीसीत जलप्रदूषण घटणार, सांडपाण्याचा प्रश्न सुटणार

बुटीबोरी एमआयडीसीत जलप्रदूषण घटणार, सांडपाण्याचा प्रश्न सुटणार

नागपूर: बुटीबोरी एमआयडीसीत सांडपाण्यामुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्या दूर होण्यास मदत मिळणार आहे. ‘नीरी’तर्फे विकसित ‘एसटीपी’ला (सिव्हेज ट्रीटमेंट प्लान्ट) कार्यान्वित करण्यात आले आहे. इंडो-युरोपिअन जल तंत्रज्ञान कार्यक्रम ‘होरायझन-२०२०’ अंतर्गत असलेल्या ‘पवित्र’ या प्रकल्पाचा भाग म्हणून ही ‘एसटीपी’ उभारण्यात आली आहे.

एमआयडीसीतील उद्योगांमधून मोठ्या प्रमाणावर सांडपाणी निघते व त्यावर योग्य प्रक्रिया होत नसल्याने ते वाया जात होते. या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ‘एसटीपी’ उभारण्याचा प्रस्ताव आला. ‘नीरी’ने ‘लार्स एन्व्हायरो’सोबत हा प्रकल्प उभारला. या प्रकल्पामुळे दर दिवशी ५० घनमीटर सांडपाण्यावर प्रक्रिया करता येणार आहे. यात ‘एमबीबीआर’ (मुव्हिंग बेड बायो फिल्म रिॲक्टर) आणि ‘एसएएफएफ’ (सबमर्ज्ड एरोबिक फिक्स्ड फिल्म) या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे. ‘एमबीबीआर’मुळे केवळ कचऱ्याचेच विघटन होत नाही तर सांडपाण्याचे नायट्रिफिकेशन आणि डीनायट्रिफिकेशनचेदेखील काम होते. तर सांडपाण्यातील सेंद्रिय पदार्थ कमी करण्यासाठी ‘एसएएफएफ’चा वापर करण्यात येतो.

‘नीरी’चे संचालक डॉ. अतुल वैद्य व माजी संचालक डॉ. सुकुमार देवोटा यांच्या उपस्थितीत एसटीपी कार्यान्वित करण्यात आला. यावेळी एमआयडीसीचे वरिष्ठ अभियंता सुनील आकुलवार, व्हीएनआयटीचे माजी प्राध्यापक डॉ. व्ही. ए. म्हैसाळकर, वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक डॉ. हेमंत कुलकर्णी, डॉ. हेमंत पुरोहित, डॉ. साधना रायलू, मुख्य शास्त्रज्ञ डॉ. पवन लाभसेटवार, ‘लार्स एन्व्हायरो’चे सीईओ डॉ. रमेश दर्यापूरकर, डॉ. गिरीश पोफळी, नितीन नाईक, प्रवीण शेष प्रामुख्याने उपस्थित होते.

कमी उर्जेत जास्त कार्यक्षमता
एमआयडीसी बुटीबोरी येथे स्थापित ‘एसटीपी’मुळे कमी उर्जेत जास्त कार्यक्षमतेत काम होणार आहे. पोषकतत्त्वांनी युक्त सांडपाणी सार्वजनिक उद्यानांमध्ये बागकामासाठी पुन्हा वापरण्यात येईल. सांडपाणी प्रक्रियेसाठी लागू केलेले तांत्रिक पर्याय किफायतशीर आहेत. यामुळे जलप्रदूषण कमी होण्यास मदत मिळेल.

Web Title: Water pollution will be reduced in Butibori MIDC, sewage problem will be solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर