वीरमातेने पुढे चालविले शहीद मुलाचे ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:48 AM2018-10-24T11:48:55+5:302018-10-24T11:51:33+5:30

भारतीय लष्करात कॅप्टन पदावर असणाऱ्या जेमतेम २६ वर्षाच्या विनायकला सर्जिकल स्ट्राईकमध्ये वीरमरण आले. सर्वस्व गमावल्याच्या भावनेने अनेक दिवस भान हरपल्यासारखे गेले. पण त्याचा मृत्यू सामान्य नाही तर हा सर्वोच्च त्याग आहे, ही भावना मूळ धरू लागली.

The warrior's goal is to carry forward by his Mother | वीरमातेने पुढे चालविले शहीद मुलाचे ध्येय

वीरमातेने पुढे चालविले शहीद मुलाचे ध्येय

Next
ठळक मुद्देगप्पांमधून उलगडला वेगळ्या वाटेवरचा प्रवास सप्तकचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय लष्करात कॅप्टन पदावर असणाऱ्या जेमतेम २६ वर्षाच्या विनायकला सर्जिकल स्ट्राईकमध्ये वीरमरण आले. सर्वस्व गमावल्याच्या भावनेने अनेक दिवस भान हरपल्यासारखे गेले. पण त्याचा मृत्यू सामान्य नाही तर हा सर्वोच्च त्याग आहे, ही भावना मूळ धरू लागली. विनायक सुट्यांवर आला की शाळा महाविद्यालयात जाऊन युवकांना लष्करात येण्याचे आवाहन करीत असे. विनायकचे हे कार्य त्याच्या मृत्यूनंतर आई अनुराधा गोरे यांचे ध्येय बनले. या वीरमातेने हजारो शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना लष्कराविषयी माहिती दिली. आयुष्याला वेगळी दिशा देणारा हा प्रवास त्यांनी ‘वेगळ्या वाटा’ या कार्यक्रमात उलगडला.
सामान्य आयुष्य जगत असताना अचानक एखादी गोष्ट, घटना आयुष्याला वेगळ्या वळणावर नेणारी ठरते. मात्र हा बदल सकारात्मकतेने स्वीकारत काही माणसे या वेगळ्या वाटेवरही यशाची उंची गाठतात. अशी गुणशील व धैर्यशील माणसे आपल्या अवतीभवती असतात. त्यांचे कार्यकर्तृत्व जेवढे चकीत करणारे, तेवढेच नतमस्तकही करणारे असते. अशा ध्येयशील व्यक्तिमत्त्वांच्या जीवनाचा वेध घेणाऱ्या मुलाखतींचा ‘वेगळ्या वाटा’ हा कार्यक्रम सप्तक व छाया दीक्षित फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आला. कवी कुलगुरू कालिदास सभागृह, आयटी पार्क येथे आयोजित कार्यक्रमाची निर्मिती व सूत्रसंचालन रेणुका देशकर यांचे होते. यामध्ये वीरमाता अनुराधा गोरे यांच्यासह ज्येष्ठ न्यायवैद्यकशास्त्रज्ञ डॉ. वसुधा आपटे व मराठी खाद्यपदार्थांचे हॉटेल ‘पूर्णब्रह्म’चे संचालकद्वय जयंती कठाळे व मनीष शिरासाव यांनी त्यांच्या वेगळ्या वाटेवरचा प्रवास उलगडला. अनुराधा गोरे यांनी ‘वारस हो अभिमन्यूचे’, ‘शौर्य’ आणि ‘सियाचिन’ या गाजलेल्या पुस्तकांसह भाषणे, वृत्तपत्र स्तंभलेखनातून अपंग जवानांच्या यशोगाथा शब्दबद्ध केल्या.
वीरांच्या कुटुंबाचा अभ्यास करून तो समाजापर्यंत मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. प्रत्येकाने आधी देशाचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
रमाबाई रानडे यांच्या पणती असलेल्या डॉ. वसुधा आपटे यांनी न्यायवैद्यकशास्त्राचा अभ्यासक्रम निवडत मृतदेहांनाही न्याय मिळवून देण्याची वाट स्वीकारली. अपघात, बलात्कार, खून झालेल्या मृतदेहांची शल्यचिकित्सा करताना भीती किंवा किळस मनात बाळगण्यापेक्षा मानवसेवेच्या भावनेतून हे कार्य स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले. बंगळूरू येथे असलेले जगातील एकमेव मराठी रेस्टारेंटचे संचालकद्वय जयंती कठाळे व मनीष शिरासाव यांनी मराठी खाद्यपदार्थांची चव सातासमुद्रापलीकडे पोहचविण्याचा प्रवास मुलाखतीदरम्यान मांडला. सप्तकचे डॉ. उदय गुप्ते, विलास मानेकर व लीलाताई दीक्षित यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: The warrior's goal is to carry forward by his Mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.