Wanjari murder case : Notorious Shailesh Kedare arrested | वंजारी हत्याकांड :  कुख्यात शैलेष केदारेला अटक
वंजारी हत्याकांड :  कुख्यात शैलेष केदारेला अटक

ठळक मुद्देदोन आठवड्यांपासून पोलिसांशी लंपडाव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : युवा कंत्राटदार श्रीकांत वंजारी याचे अपहरण करून हत्या करणारा मुख्य आरोपी शैलेश केदारे याला अखेर हुडकेश्वर पोलिसांनी शुक्रवारी कारागृहातून ताब्यात घेतले. गेल्या दोन आठवड्यांपासून तो पोलिसांसोबत लपाछपी करीत होता.
कुख्यात शैलेश केदारे हा गँगस्टर संतोष आंबेकरचा भाचा आहे. तो खतरनाक गुंड असून, त्याच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो खंडणी वसुलीसोबतच शहरातील विविध भागात अवैध सावकारीही करतो. गरीब कुटुंबातील श्रीकांत वंजारी इकडून तिकडून रक्कम जमवून इलेक्ट्रीक फिटींगच्या कामाचे कंत्राट घेत होता. एका कंत्राटाच्या पूर्ततेसाठी श्रीकांतने केदारेकडून काही रक्कम उधार घेतली होती. त्यातील बरीचशी रक्कम त्याने परत केली होती. मात्र, अव्वाच्या सव्वा व्याज आकारून त्या रकमेच्या वसुलीसाठी आरोपी केदारे आणि त्याच्या साथीदारांनी श्रीकांतमागे तगादा लावला होता. आर्थिक कोंडीमुळे श्रीकांत त्याला वेळ मागत होता. या पार्श्वभूमीवर, रक्कम वसूल करण्यासाठी केदारे तसेच त्याच्या टोळीतील गुंड साथीदार विक्की भोसले, अजिंक्य धोबड़े, सूरज राऊळ आणि आदर्श सातपुते तसेच अन्य आरोपींच्या मदतीने ५ मे रोजी श्रीकांत वंजारीचे अपहरण केले. त्याला चाकू, लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या वंजारीचा ८ मे रोजी मृत्यू झाला.
हुडकेश्वर पोलिसांनी या प्रकरणी केदारे आणि साथीदारांविरुद्ध अपहरण, हत्या करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. प्रारंभी विक्की भोसलेला अटक करण्यात आली. नंतर धोबडे, राऊळ आणि सातपुतेला पोलिसांनी अटक केली. मुख्य आरोपी केदारे मात्र फरार होता. त्याला अटक करण्यासाठी पोलीस शोधाशोध करीत असताना केदारे २२ मे रोजी न्यायालयात पोहचला आणि त्याने या गुन्ह्यात आत्मसमर्पण केले. त्यावेळी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविले. त्याला गुरुवारी प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे हुडकेश्वर पोलीस ताब्यात घेणार होते. मात्र, कागदपत्रांना उशिर झाल्याने गुरुवारी त्याची अटक टळली. शुक्रवारी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. शनिवारी कोर्टात हजर करून त्याच्या पीसीआरची पोलीस मागणी करणार आहेत.
पोलिसांवर कुरघोडी
पोलीस शोधाशोध करीत असताना न्यायालयात आत्मसमर्पण करून त्याने बुधवारी पोलिसांवर कुरघोडी केली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या या कुरघोडीमागे कोण आहे, त्याचाही तपास चालविला आहे.


Web Title: Wanjari murder case : Notorious Shailesh Kedare arrested
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.