निधीअभावी रखडले पुरस्कार : ग्रामसेवकांमध्ये नाराजीनागपूर : उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसेवकांना ‘आदर्श ग्रामसेवक’ पुरस्काराने पुरस्कृत करण्यात येते. गेल्या नऊ वर्षांपासून निधीअभावी आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचे वितरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे ९९ ग्रामसेवक पुरस्काराच्या प्रतीक्षेत आहेत. पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या एका ग्रामसेवकाला आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देण्यात येतो. जिल्ह्यात १३ पंचायत समित्या आहेत. त्यानुसार दरवर्षी १३ ग्रामसेवकांची आदर्श ग्रामसेवक म्हणून निवड करण्यात येते. पुरस्कार स्वरूपात त्यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन पालकमंत्री अथवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येते. २००६ पूर्वी आदर्श ग्रामसेवकाचा पुरस्कार मिळणाऱ्या ग्रामसेवकाला एक वेतनवाढ देण्याची परंपरा होती. परंतु सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यानंतर पुरेशा निधीअभावी ती परंपरा खंडित झाली. २००४ पर्यंत ग्रामसेवकांना नियमित पुरस्कार दिल्या गेले. मात्र त्यानंतर पुरस्कार देणे बंद झाले. तरीही आदर्श ग्रामसेवकांची निवड दरवर्षी होत होती. त्यांचे प्रस्ताव पाठविले जात होते. पुरस्काराचे वितरण मात्र झाले नाही. यासंदर्भात लोकप्रतिनिधींना ग्रामसेवक संघटनेतर्फे अनेकदा निवेदनही देण्यात आले. त्याचे काहीही झाले नाही आणि तब्बल नऊ वर्षापासून पुरस्कार रखडले. त्यामुळे ग्रामसेवकांमध्ये नाराजी आहे. (प्रतिनिधी)
९९ ग्रामसेवक पुरस्काराच्या प्रतीक्षेत
By admin | Updated: October 9, 2015 03:07 IST