नागपूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. सुरुवातीपासूनच विविध मुद्द्यांमुळे चर्चेत असलेल्या या निवडणुकीत मतदानाच्या पुर्वसंध्येपर्यंत ‘सस्पेन्स’ कायम राहिला. एकीकडे भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी पक्षाने सर्व मतदारांना ‘सेफहाऊस’मध्ये ठेवले असून, दुसरीकडे कॉंग्रेसकडून मतदानाच्या पूर्वसंध्येला भाजपमधून आयात करण्यात आलेले रविंद्र भोयर यांच्याऐवजी अपक्ष मंगेश देशमुख यांना समर्थन दिले. ऐनवेळी झालेल्या या बदलामुळे मतदानाच्या वेळी नेमके कुणाच्या पारड्यात कुठली मतं जातात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, निवडणुकीत ५५९ मतदार असून तीन १५ मतदान केंद्रांवर मतदान होईल.
नागपूर शहरातील तीन मतदान केंद्र व ग्रामीण भागातील १२ अशा एकूण १५ केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ८ ते ४ असणार आहे. मतदानाला एक दिवस शिल्लक असताना कॉंग्रेस व भाजपकडून सावध पवित्रा घेण्यात आला. भाजपने मतदार विरोधकांकडे वळू नयेत यासाठी नगरसेवकांना विविध ठिकाणी सहलीला पाठविले होते. यातील बहुतांश नगरसेवक बुधवारी परतले. मात्र नागपुरात परतल्यानंतर सर्वांची रवानगी पेंच येथील ‘रिसॉर्ट’वर करण्यात आली. मतदानाच्या दिवशी सर्व नगरसेवक थेट मतदान केंद्रांवर येणार आहेत. नगरसेवक कुणाच्याही संपर्कात येऊ नयेत यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत पदाधिकाऱ्यांची त्यांच्यावर नजर राहणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी मतदारांना मतदान नेमके कसे करायचे व पसंतीक्रम कसा भरायचा, मत अवैध ठरू नये यासाठी नेमक्या कुठल्या चुका टाळायच्या याबाबत ‘रिसॉर्ट’मध्ये मार्गदर्शन करण्यात आले.
तापमान जास्त आढळले तरी करता येणार मतदान
या निवडणुकीमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रत्येक मतदान केंद्रासाठी करण्यात आलेल्या आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर थर्मल स्कॅनिंग केले जाणार आहे. स्कॅनरमध्ये शरीराचे तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त आढळल्यास अशा मतदारांना शेवटच्या एका तासामध्ये मतदान करता येणार आहे. सर्व केंद्रावर सॅनिटायझर थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
असे आहेत मतदार
नागपूर महानगरपालिका : १५५
जिल्हा परिषद : ७०
नगरपरिषद व नगरपंचायत : ३३४