लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकशाही परंपरेचे जतन करण्यासाठी मुक्त आणि निष्पक्ष वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य जपताना प्रत्येक भारतीयाने निर्भयपणे मतदानाचा हक्क बजाविण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.
राष्ट्रीय मतदार दिनाचा मुख्य कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जगातील सर्वांत कमी उंचीची महिला ज्योती खेमचंद आमगे, राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू जयंत दुबळे, ग्रॅण्डमास्टर रौनक साधवानी, निवडणूक उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर यावेळी उपस्थित होते. निवडणूक उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर यांनी प्रास्ताविक, तर निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी यांनी स्वागत केले.
यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मतदान करणे हे राष्ट्रीय कार्य आहे. लोकशाही परंपरेचे जतन करण्यासाठी मी मतदान करणार तसेच मतदार यादीत नाव नोंदविणे हा माझा अधिकार आहे. मी भारताचा मतदार असल्याचा मला अभिमान आहे, अशा घोषवाक्यांचे फलक घेऊन प्रबोधन करण्यात आले. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सायकलपटू सहभागी झाले होते. यावेळी मोठ्या संख्येने नव मतदार, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
जगातील सर्वात कमी उंचीच्या ज्योती आमगे यांचा गौरव
मतदार जागृती अभियानामध्ये सहभाग घेतल्याबद्दल ज्योती आमगे, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू जयंत दुबळे, तसेच भारताला नावलौकिक मिळवून दिलेले ग्रॅण्डमास्टर रौनक साधवानी यांचा विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी विशेष गौरव केला. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आदर्श मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून काम केलेल्या बारा मतदान केंद्राधिकाऱ्यांचा स्मृतिचिन्हे देऊन गौरव करण्यात आला.