नागपूर : २००८ च्या तुलनेत २०१४ मध्ये झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत लाखभर मतदार वाढले असले तरी मतदान मात्र २००८ च्या तुलनेत कमी झाले. त्यामुळे निवडणुकीच्या जयपराजयाबाबत बांधले जाणारे अंदाज चुकण्याची शक्यता आहे.२००८ च्या निवडणुकीत मतदारांची संख्या १ लाख ८५ हजार होती व त्यावेळी ५२ टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदारांची संख्या २ लाख ८७ हजारावर गेली. पण मतदान ३८ टक्केच झाले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपर्यंत नावनोंदणी सुरु होती. काँग्रेस, भाजपसह अपक्ष उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात मतदारांची नोंदणी केली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणेच पदवीधरमध्येही विक्रमी मतदान होईल, असा अंदाज होता. नवमतदारांमध्ये उत्साह अधिक जाणवत होता. मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदारांमध्ये अपेक्षेप्रमाणे उत्साह दिसून आला नाही. सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासात फक्त ५.१० टक्के, दुसऱ्या दोन तासात (दुपारी १२ पर्यंत) १७.०६ टक्के तर त्यानंतरच्या दोन तासात (दुपारी २ पर्यंत) २५.३४ टक्के मतदान झाले होते. शेवटच्या तासात मतदान वाढेल, असे वाटत असतानाही अपेक्षेप्रमाणे वाढ झाली नाही. नागपूरमध्ये पश्चिम आणि दक्षिण पश्चिम या दोन विधानसभा मतदारसंघात मतदारांना बाहेर काढण्यासाठी भाजपचे नेटवर्क काम करीत होते. प्रथमच भाजपच्या बालेकिल्ल्यातही काँग्रेसचे बुथ पाहायला मिळाले. (प्रतिनिधी)नावांचा घोळयंदा प्रथमच पदवीधर मतदारसंघाची मतदार यादी संकेतस्थळावर टाकण्यात आली होती. मात्र तांत्रिक कारणांमुळे अनेकांना त्यांची नावे मतदार यादीत सापडली नाही. काहींची नावे यादीत नव्हती. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. अनेकांनी याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन विचारणा केली. राजकीय पक्षांनी मतदारांचे अर्ज भरून निवडणूक शाखेकडे सादर केले होते. त्यामुळे आपले नाव यादीत असेल या विश्वासाने नव मतदार केंद्रावर आले. पण त्यांची निराशा झाली.
मतदार वाढले, मतदान घटले
By admin | Updated: June 21, 2014 02:34 IST