श्री साईबाबा सेवा मंडळाच्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी यांनी सहायक म्हणून अधीक्षक महेन्द्र सहारे, विजय चव्हाण व निरीक्षक हरीहर गाडगे यांची नियुक्ती केली आहे. निवडणुकीसाठी मतदारांची यादी २४ जून रोजी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, नागपूर व श्री साईबाबा सेवा मंडळ नागपूर या न्यासाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या सभासद यादीतील सदस्यांच्या अनुषंगाने कोणत्याही सभासदाचे आक्षेप, हरकत असल्यास संबंधितांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सक्षम प्राधिकरण, सक्षम अधिकारी यांच्यासमोर दाखल करुन त्यांचे निराकरण करुन त्याबाबतच्या आदेशाची प्रमाणित प्रत निवडणूक अधिकारी यांच्यासमोर सादर करावी, असे आवाहनही निवडणूक अधिकारी श्री. सातव यांनी केले आहे.
मतदार यादी प्रसिद्ध करणे, प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीवर आक्षेप नोंदविणे, सक्षम प्राधिकरण/ सक्षम अधिकारी यांच्याकडून आक्षेपाचे निराकरण करुन घेणे व निराकरणाच्या आदेशाच्या प्रमाणित प्रती निवडणूक अधिकारी यांच्यासमोर सादर करण्यासाठी २४ जून ते २० जुलैपर्यंतचे वेळापत्रक जाहीर केले असून त्यानुसार मतदार यादीसंदर्भातील कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे.