लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आघाडीच्या खेळाडूंचा शानदार फॉर्म, सांघिक योगदान तसेच स्थानिक परिस्थितीचा लाभ घेणारा गत उपविजेता विदर्भ संघ व्हीसीएच्या जामठा स्टेडियमवर बुधवारपासून केरळविरुद्ध रणजी करंडक अंतिम सामन्यासाठी सज्ज झाला आहे. यंदा अपराजित राहिलेल्या विदर्भाकडे मुंबईला उपांत्य फेरीत धूळ चारल्यामुळे जेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे.
अक्षय वाडकरच्या नेतृत्वात विदर्भाने सातत्य राखले असून, यंदा विजय हजारे करंडकाची अंतिम फेरीही गाठली होती. फलंदाजांनी शानदार कामगिरी केली तर गोलंदाजांनीही स्वत:ची भूमिका चोखपणे बजावली. विदर्भ २०१७-१८ आणि २०१८-१९ मध्ये रणजी चॅम्पियन राहिला आहे. तसेच, मागच्या वर्षी फायनलमध्ये मुंबईकडून पराभव पत्करावा लागला होता. दुसरीकडे, केरळ पहिल्यांदा फायनल खेळत असून त्यांना नशीबाचीही मोठी साथ लाभली आहे.
उपांत्यपूर्व सामन्यात केरळने जम्मू-काश्मीरला केवळ एका धावेच्या आघाडीने नमवले. तर उपांत्य सामन्यात पहिल्या डावात अवघ्या दोन धावांची आघाडी मिळवून गुजरातला नमविले होते. कागदावर दोन्ही संघ मजबूत असून सामन्याच्या पूर्वसंध्येवर मंगळवारी उभय संघांनी कसून सराव केला. सरावानंतर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी विजयाबद्दल आशा व्यक्त केल्यामुळे लढत निश्चितच संघर्षपूर्ण होणार असली तरी, यजमानांचे पारडे जड आहे.
१०० बळींचा विक्रम दृष्टिपथात...विदर्भाचा अष्टपैलू फिरकी गोलंदाज २२ वर्षांचा हर्ष दुबे याने यंदा ६६ बळी घेतले. सर्वाधिक बळींपासून तो दोन बळी दूर आहे. बिहारच्या आशुतोष अमन याने २०१८-१९ मध्ये एका सत्रात ६८ बळी घेतले होते.
हर्षने फायनमध्ये काही बळी घेतल्यास तो विदर्भाकडून सर्वांत कमी सामन्यात १०० बळींचा टप्पा गाठू शकतो. आदित्य सरवटेने २१ सामन्यांत १०० बळी पूर्ण केले. हर्षला १८ व्या सामन्यात विक्रम मोडण्याची ६ बळींची गरज असेल.