नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फायर सेफ्टी डिव्हाईस प्लॅन लालफीतशाहीत अडकून पडल्याने १० निष्पाप जीवांचे बळी गेले. भंडारा जिल्हा रुग्णालयातील थरारक जळीतकांडानंतर हे जळजळीत वास्तव पुढे आले आहे.
रोज सुमारे ७०० ते ८०० रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची भंडारा जिल्हा रुग्णालयात वर्दळ असते. दोन दक्षकांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या या इमारतीत आग लागू शकते आणि आग लागल्यास तेथे चांगली फायर सेफ्टी डिव्हाईस (अग्निशमन सुरक्षा यंत्रणा) हवी असल्याचे तेथील रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात गेल्या वर्षीच आले होते. आग लागल्यास भयंकर आक्रित घडू शकते. त्यामुळे तेथे अद्ययावत अग्निशमन सुरक्षा प्रणाली उभारण्यासाठी काय करता येईल, यावर विचार झाला होता. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी कार्यकारी अभियंत्यांकडून १ कोटी ५२ लाख रुपये खर्चाचा प्लॅन तयार करून घेतला. हा प्लॅन आणि निधीच्या मागणीचे पत्र ८ मे २०२० ला आरोग्य विभागाच्या उपसंचालकांना पाठविले. ते पत्र धूळखात पडल्याचे लक्षात आल्यानंतर पुन्हा १५ जूनला दुसरे पत्र पाठविण्यात आले. मात्र, संबंधित वरिष्ठांकडून त्याला तत्परतेने प्रतिसाद मिळाला नाही. फायर सेफ्टी डिव्हाईस प्लॅन लालफीतशाहीत अडकून पडल्याने
शनिवारी पहाटे आक्रित घडले. १० नवजात शिशूंचे जीव गेले. आता यंत्रणा डोळ्यात अंजन घातल्यासारखी खडबडून जागी झाली. आता संपूर्ण राज्याची यंत्रणाच भंडाऱ्याकडे डोळ्यावरचे झापड उघडल्यासारखी बघू लागली आहे.
अवघ्या दीड कोटींच्या सुरक्षा उपकरणांच्या मागणीपत्राकडे दुर्लक्ष करणारी सरकारी यंत्रणाही आता आपले पाप झाकण्यासाठी तत्परतेने कामी लागली आहे.
डीडींचा नो रिस्पॉन्स
या घडामोेडीच्या अनुषंगाने आरोग्य उपसंचालक डॉ. संजीव जयस्वाल यांच्या मोबाईलवर वारंवार संपर्क करण्याचा लोकमतने प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे फायर सेफ्टी डिव्हाईस प्लॅन त्यांच्याकडे आला की नाही, तो कुठे अडला आणि या प्लॅनचे घोडे अडविण्यासाठी नेमके जबाबदार कोण, ते स्पष्ट होऊ शकले नाही.