आरटीओ कार्यालयासमोरच नियमाचे तीन-तेरा
ऑन द स्पॉट
फहिम खान
नागपूर : शहरातील रस्त्यांवर झपाट्याने वाढत असलेल्या वाहनांवर अंकुश लावण्यासाठी आणि शहरातील हवा प्रदूषणमुक्त राखण्यासाठी महानगरपालिकेने सायकल ट्रॅक तयार करून सायकलिंगला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार शहरातील काही भागात सायकल ट्रॅक बनविण्याचा पायलट प्रोजेक्ट सुरु करण्यात आला आहे. ‘लोकमत’ने या सायकल ट्रॅकची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी निरीक्षण केले असता आश्चर्यकारक माहिती समोर आली. सायकलस्वार आरामात सायकल चालवू शकतील अशी परिस्थिती आतापर्यंत तयार केलेल्या सायकल ट्रॅकवर कुठेही दिसून आली नाही. बोले पेट्रोल पंप चौकापासून काहीच अंतरावर आरटीओ कार्यालय आहे. या कार्यालयाच्या अगदी समोर दोन्ही लेनवर सायकल ट्रक तयार करण्यात आला आहे. सकाळच्या वेळी या सायकल ट्रॅकचा वापरही होऊ लागला आहे, परंतु दुपारनंतर या ट्रॅकवर नागरिक आपली वाहने उभी करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. आरटीओ कार्यालयाच्या समोर पीयूसीची वाहने, कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची वाहने, दलालांची वाहने पार्किंग करण्यात येत आहेत. येथे बसस्टॉपजवळ दुचाकीवाल्यांनी ट्रॅकवरच पार्किंग तयार केल्याचे दिसले.
..........
सायकल ट्रॅक मोकळा हवा
‘मी दररोज मित्रांसोबत शहरात सायकलिंग करतो. आम्ही सायकलिंगचा एक ग्रुपही बनविला आहे, परंतु रस्त्याने जाताना आम्हाला वाहतुकीमुळे त्रास होतो. आता शहरात सायकल ट्रॅक तयार करण्यात येत आहे. याचा फायदा आम्हाला नक्कीच होईल. परंतु अधिकाधिक नागरिकांनी सायकलचा वापर करावा यासाठी हा सायकल ट्रॅक नेहमी मोकळा राहण्याची गरज आहे.’
-डॉ. सुशांत चंदावार, सायकलस्वार
जनजागरण करणे आवश्यक
शहराच्या काही भागात आतापर्यंत महापालिकेच्या वतीने सायकल ट्रॅक तयार केले आहेत. मुख्य मार्गाच्या रस्त्यावर एका बाजूला सायकल चालविण्यासाठी केवळ पांढरा रंगाची लाईनच तयार करण्यात आली नाही, तर या ट्रॅकमध्ये लाल रंगाच्या डब्यात सायकलचे चिन्ह टाकण्यात आले आहे. यावरून हा ट्रॅक केवळ सायकल चालविणाऱ्यांसाठी आरक्षित असल्याचे स्पष्ट होते. परंतु अमरावती मार्गावर बोले पेट्रोल पंप ते लॉ कॉलेज चौक परिसरात असलेल्या सायकल ट्रॅकवर नागरिक खुलेआमपणे आपल्या वाहनांची पार्किंग करीत आहेत. त्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे.
..................