हजारो ठेवीदारांना कोट्यवधींचा गंडा : सूत्रधारासह नऊ आरोपींवर गुन्हे दाखल | ||
नागपूर : हजारो ठेवीदारांकडून शेकडो कोटी रुपयांच्या ठेवी घेऊन त्यांची फसगत करणार्या बहुचर्चित वासनकर समूहाच्या संचालकांसह नऊ जणांविरुद्ध अखेर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. लोकमतने वासनकर समूहाची बनवाबनवी उघड करणारी वृत्तमालिका छापून ठेवीदार आणि तपास यंत्रणांचे लक्ष वेधले होते, हे येथे उल्लेखनीय ! वासनकर समूहाचा सर्वेसर्वा प्रशांत जयदेव वासनकर (रा. कॉसमॉस टाऊन, त्रिमूर्तीनगर) याने आपल्या साथीदारांसह धरमपेठेतील शिवाजीनगरात वासनकर वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड नावाने कंपनी कम दुकानदारी सुरू केली होती. प्रशांत, त्याचे सहकारी आणि दलालांनी गेल्या ५ वर्षात हजारो गुंतवणूकदारांकडून शेकडो कोटींच्या ठेवी बेकायदेशीररीत्या गोळा केल्या. ठेवीदारांना आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून रक्कम (ठेवी) गोळा केल्या जात होत्या. वासनकरचे काही सहकारी आणि दलाल अल्पावधीत दामदुप्पट रक्कमेचे आमिष दाखवून ठेवीदारांना रक्कम गुंतविण्यासाठी बाध्य करीत होते. नागपूरसह ठिकठिकाणच्या हजारो गुंतवणूकदारांकडून त्यांनी अशाप्रकारे शेकडो कोटी रुपये गोळा केले होते. त्यांच्याकडे ठेवी ठेवणार्यांमध्ये शहरातील लब्धप्रतिष्ठित, उद्योजक, व्यापारी, बिल्डरसह विविध क्षेत्रातील अनेक नामवंतांचा समावेश आहे. लक्ष्मीनगरातील बिल्डर विवेक अशोक पाठक यांनीही २ कोटी, ७४ लाख, ३६ हजारांची रक्कम ठेवीच्या रूपाने वासनकरकडे दिली. मात्र, नियोजित अवधी संपल्यानंतर पाठक यांच्यासह अनेकांना त्यांची रक्कम परत मिळाली नाही. पोलिसांनी खिसे भरले वासनकरच्या विरोधात अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रारी गेल्या. पोलिसांनी त्या चौकशीत ठेवल्या. वारंवार गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार्यांना पोलीस वेगळ्या पध्दतीने समजावत होते. एकदा गुन्हा दाखल झाला तर नंतर तुमचे पैसे परत मिळणार नाही', त्यामुळे आत्ताच विचार करा', असा सूचक इशारा पोलीस देत होते. परिणामी गुंतवणूकदार तक्रार अर्ज मागे घेण्याची भाषा वापरत होते. त्या बदल्यात पोलीस वासनकरकडून मोठी रक्कम उकळत होते. गेल्या दोन वर्षात अनेकदा हे प्रकार घडले. पाठक यांचेही असेच झाले. त्यांनी दीड वर्षात वासनकरवर वेगवेगळ्या पध्दतीने दबाव आणून आपली रक्कम वसुलण्याचे प्रयत्न केले. मात्र, वासनकरही निगरगट्ट निघाला. त्याने पाठकांच्या कोणत्याच तंत्राला दाद दिली नाही. उलट गेल्या आठवड्यात पाठक यांनी घेतलेल्या अन्य ठेवीदाराच्या बैठकीत आपले सहकारी पाठवून ही बैठकच उधळली. आपली रक्कम मिळणार नाही, असे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याचा हट्ट धरला. या पार्श्वभूमीवर वासनकर आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली. आज अंबाझरी ठाण्यात गुन्हेशाखेच्या अधिकार्यांनी वासनकर, त्याची पत्नी, भाऊ आणि इतर नातेवाईकांसह नऊ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले.या सर्वांच्या घरी आणि कार्यालयात गुन्हेशाखेचे निरीक्षक सुधाकर ढाणे आणि त्यांचे सहकारी झाडाझडती घेत आहेत. कोंढाळीच्या फार्म हाऊस आणि घरातून मोठय़ा रक्कमेसह कागदपत्रेही पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे.(प्रतिनिधी) |