नागपुरात आसमंतात एकसुरात निनादला वंदे मातरम्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 09:12 PM2019-08-14T21:12:02+5:302019-08-14T21:15:27+5:30

जोश, जल्लोष आणि उत्साहाच्या वातावरणात वंदे मातरम् या मंत्राचे सूर संत्रानगरीच्या आसमंतात निनादले.

Vande Mataram singled in unison at Nagpur's surroundings | नागपुरात आसमंतात एकसुरात निनादला वंदे मातरम्

आसमंतात निनादले वंदे मातरम : मातृभूमी प्रतिष्ठानच्यावतीने बुधवारी सक्करदरा चौक येथे आयोजित अखंड भारत संकल्प दिन कार्यक्रमात हजारो शाळाकरी विद्यार्थी, शिक्षक, पालक व नागरिकांनी एक सुरात वंदे मातरम्चे गायन केले आणि हा स्वर आसमंतात निनादला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अभिनेता व खासदार सनी देओल प्रामुख्याने उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांमध्ये उत्साह, जोश आणि जल्लोष : मातृभूमी प्रतिष्ठानचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा बीजमंत्र राहिलेल्या ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने देशाच्या भावी पिढीमध्ये राष्ट्रभक्तीचा हुंकार चेतविला. विद्यार्थ्यांमध्ये हीच देशभक्तीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने अखंड भारत संकल्प दिनानिमित्त सक्करदरा चौकात दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन झाले. यामध्ये शहरातील अनेक शाळांनी सहभाग नोंदविला. जोश, जल्लोष आणि उत्साहाच्या वातावरणात वंदे मातरम् या मंत्राचे सूर संत्रानगरीच्या आसमंतात निनादले.
मातृभूमी प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाचे आयोजन करण्यात येत असून, दरवर्षी लोकांचा प्रतिसाद वाढत आहे. यावर्षी सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र म्हणजे चित्रपट अभिनेता व भाजपचे खासदार सनी देओल हे होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही प्रामुख्याने उपस्थित होते. सकाळी विविध शाळांचे विद्यार्थी आकर्षक गणवेशात हातात तिरंगा ध्वज घेऊन शिक्षकांसह सक्करदरा चौकाच्या कार्यक्रमस्थळी एकत्र आले. यात ३० च्यावर शाळांच्या हजारो विद्यार्थ्यांचा समावेश होता. या सर्वांच्या मुखामध्ये देशभक्तीचे गाणे गुणगुणत होते. सहभागी झालेल्यांमध्ये प्रामुख्याने पं. बच्छराज व्यास विद्यालय, प्रेरणा कॉन्व्हेंट, केशवनगर शाळा, सरस्वती शिशू मंदिर, लोकांची शाळा आदी दक्षिण आणि पूर्व नागपुरातील शाळा होत्या. परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पावसाचे वातावरण असतानाही हजारोंच्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांचा उत्साह बघता या कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद समजला जाऊ शकतो. ढोलताशांच्या गजरात सनी देओल व नितीन गडकरी यांचे आगमन झाले. संपूर्ण वातावरण देशभक्तिमय झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. यानंतर शिक्षकांनी आणि पालकांनी एकासुरात वंदे मातरम् गीत सादर केले. क्रांतिकारकांना देशासाठी बलिदान देण्याची प्रेरणा देणारे व देशभक्तीने भारलेले हे गीत संपूर्ण आसमंतात निनादले. यावेळी विद्यार्थी विविध क्रांतिकारकांच्या वेशभूषेत सजून आले होते. हातात तिरंगा घेऊन देण्यात आलेल्या ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला. याप्रसंगी आयोजक व मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भोयर यांच्यासह महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, रामदास आंबटकर, गिरीश व्यास, भाजप शहर अध्यक्ष प्रवीण दटके, शेखर सावरबांधे, किशोर कुमेरिया, दीपक कापसे आदी मान्यवर उपस्थित होते.
यानंतर विद्यार्थी, शिक्षकांनी आणि पालकांनी एकासुरात वंदे मातरम् गीताचे गायन केले. क्रांतिकारकांना देशासाठी बलिदान देण्याची प्रेरणा देणारे व देशभक्तीने भारलेले हे गीत संपूर्ण आसमंतात निनादले. पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी वंदे मातरम्चा जयघोष करीत वातावरण भारावून सोडले. या जोशपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.
आयोजनात ईश्वर धीरडे, दीपक धुरडे, उषा पॅलट, शीतल कामडे, दिव्या धुरडे, नीता ठाकरे, स्नेहल बिहारे, विजय आसोले, अनिल लांबाडे, रवी अंबाडकर, विकास बुंडे, मनोज जाचक, राम कोरके, नरेंद्र गोरले, प्रशांत तुंगार, अभिजित मुळे, आशू वैद्य व मातृभूमी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा सहभाग

अखंड भारताचे संकल्प पूर्ण करू हा विश्वास : गडकरी 


आपण दरवर्षी १४ ऑगस्ट हा अखंड भारत संकल्प दिन म्हणून साजरा करतो. अखंड भारत हे आमचे स्वप्न आहे आणि हे स्वप्न आम्ही पूर्ण करणारच, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. १५ ऑगस्टला येणारा स्वातंत्र्यदिन हे आनंदाचेच पर्व असते. मात्र यावर्षी हा आनंद वेगळ्या कारणानेही द्विगुणित झाला आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी धुडगूस घातला होता. मात्र केंद्र शासनाद्वारे काश्मीरमधून ३७० कलम हटविण्याच्या एका निर्णयाने अतिरेक्यांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे हा स्वातंत्र्यदिन अधिक आनंददायी झाल्याची भावना गडकरी यांनी व्यक्त केली.
हिंदुस्थान जिंदाबाद था, है और रहेगा : सनी देओल 

सनी देओल भाषणासाठी उभे होताच विद्यार्थी व नागरिकांमध्येही उत्साह संचारला. त्यांनीही जोशपूर्ण स्वरात ‘हिंदुस्थान जिंदाबाद है, जिंदाबाद था और जिंदाबाद रहेगा...’ हा गदर चित्रपटातील संवाद ऐकवीत उपस्थित नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये दुप्पट जोश भरला. त्याला प्रतिसाद देत वंदे मातरम् व भारतमाता की जयच्या घोषणांनी परिसर पुन्हा दुमदुमला. सुनी यांनी ‘बच्चो...’ अशी सुरुवात करीत, तुमचा उत्साह पाहून अखंड भारत होईल, असा विश्वास वाटत असल्याची भावना व्यक्त केली. भगतसिंह, राजगुरू, सुखदेव आदी क्रांतिकारकांनी या देशासाठी प्राणाची आहुती दिली. त्यामुळे हा स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करताना त्यांचा विसर पडता कामा नये. तुम्ही या देशाची शक्ती आहात. आपला देश महान आहेच आणि तो नेहमी राहावा, हा विचार आपण करतो. ही भावना तुमच्या मनात सदैव कायम राहू द्या, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

Web Title: Vande Mataram singled in unison at Nagpur's surroundings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.