नागपूर : क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य लढतीत भारतीय संघ सिडनी येथे सामना खेळत असताना उपराजधानीतदेखील दिवसभर क्रिकेटचाच माहौल होता. संपूर्ण विश्वचषकात दिमाखदार कामगिरी करणाऱ्या ‘टीम इंडिया’चा पराभव क्रिकेटप्रेमींना चटका लावून गेला. ‘वलनी एक्सप्रेस’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या उमेश यादवने चार बळी मिळवत दाखविलेला लढाऊ बाणा भारताला अंतिम फेरीत नेऊ शकला नाही याची हळहळ नागपूरकरांनी व्यक्त केली. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर नागरिकांमध्ये सर्वात जास्त उत्सुकता याच सामन्याची पहायला मिळाली. अनेकांनी तर कार्यालयातून सुटी काढली होती तर काहींनी दांडी मारली. महाविद्यालयांतदेखील अशीच स्थिती होती. वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमीच होती. एरवी सकाळी न उठणारे महाभागदेखील सर्व आवरून ७.३० पासूनच दूरचित्रवाणी संचासमोर बसले होते. सामना सुरू होण्याच्या अगोदर शहरातील काही मंदिरात चाहत्यांकडून प्रार्थना करण्यात आली. भारताच्या गोलंदाजांवर कांगारुंनी आक्रमण सुरू केल्यानंतर क्रिकेटचाहत्यांचे ‘बीपी’ वाढण्यास सुरुवात झाली होती. उमेश यादवने ४ बळी घेतले. त्यामुळे आॅस्ट्रलियाला ३५० च्या वर जाता आले नाही असे समाधान व्यक्त करण्यात येत होते. भारतीय संघाची फलंदाजीतील कामगिरी लक्षात घेता हे ३२९ च्या लक्ष्याचा पाठलाग सहज होईल, अशी आशा नागरिकांना होती. परंतु एकापाठोपाठ एक गडी बाद होत गेले अन् नागपूरकरांची आशा मावळत गेली. (प्रतिनिधी)
‘वलनी एक्सप्रेस’ धावली, पण...
By admin | Updated: March 27, 2015 02:03 IST