लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ६० वर्षांवरील पात्र नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील अडीच लाख पात्र नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी ६८ लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. लसीकरण मोहिमेच्या पहिल्याच दिवशी सुमारे साडेसहा हजारांपेक्षा जास्त पात्र नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासन, नागपूर जिल्हा परिषद व ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने ६० वर्षांवरील व ४५ पेक्षा जास्त वयोगटातील विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांसाठी आजपासून लसीकरणाची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ४९ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १३ ग्रामीण रुग्णालय तसेच ६ उपरुग्णालय अशा ६८ केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे. प्रत्येक गावानिहाय लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असून, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, शिक्षक व ग्रामसेवक यांच्या सहकार्याने गावातील पात्र नागरिकांची नोंदणी करून त्यानुसार लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरणासाठी प्रत्येक केंद्रावर दररोज २५० नागरिकांची सुविधा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय लसीकरणाला सुरुवात झाली असून, तहसीलदार तसेच खंडविकास अधिकारी या मोहिमेचे नियोजन करत आहे. प्रत्येक केंद्रावर जास्तीत जास्त पात्र नागरिकांना लस देण्यासंदर्भात ग्रामस्थांमध्ये जागृती करून केंद्रापर्यंत आणण्याची व्यवस्था करत आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी कामठी तालुक्यातील विशेष लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला तसेच लसीकरण केंद्रांवर आलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून लसीकरण करण्याविषयी ग्रामस्थांना आवाहन केले. यावेळी कामठीचे सभापती उमेश रडके, सदस्य पूनम मालोदे, सरपंच शेषराव बोरकर, उपसरपंच वर्षा आगलावे, सरिता डाफ, कोमल कठाणे, यशोदरा खेडकर यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय माने, डॉ. तिवारी, डॉ. गणवीर, विस्तार अधिकारी मनीष दिगाडे, पंकज वांढरे, राजू फरताडे आदी उपस्थित होते.