लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. कोरोनाशी लढा देताना हलगर्जीपणा नको, नागरिकांनी अधिक सतर्क राहून कोविड संदर्भातील दिशानिर्देशांचे पालन करणे गरजेचे आहे. परंतु अजूनही अनेकजण मास्कचा वापर करीत नाहीत. फिजिकल डिस्टन्सचे पालन होत नाही. असा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. अन्यथा नागपूर शहरातील मास्क न वापरणाऱ्यांना एक हजार रुपये दंड केला जाईल.असा इशारा मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी दिला आहे.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी दिल्ली शहरात मास्क न वापरणाऱ्यांना दोन हजार रुपये दंड केला आहे. औरंगाबाद शहरात मास्क न वापरणाऱ्या व्यापाऱ्यांची दुकाने बंद ठेवली जात आहे. नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हे मास्क वापरणाऱ्यांना एक हजार रुपये दंड करण्यात आला आहे. शहरातील अनेक दुकानदार व बेजबाबदार नागरिक मास्क न वापरता फिरत असल्याचे आढळून येत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ करणार का, असा प्रश्न मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना केला असता ते म्हणाले, मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून आतापर्यंत ९१ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पथकामार्फत दररोज कारवाई केली जात आहे. असे असतानाही नागरिकांच्या वर्तनात बदल न झाल्यास नागपूर शहरातही दंडाची रक्कम एक हजार रुपये केली जाईल.असे संकेत त्यांनी दिले.
२१४७९ लोकाकडून ९१ लाख वसूल
सुरुवातीला नागपूर शहरातील मास्क न वापरणाऱ्यांना २०० रुपये दंड केला जात होता १५ सप्टेंबरपर्यंत मास्क न वापरणाऱ्या ५४७० लोकांकडून १० लाख ९४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यानंतर २६ नोव्हेंबर पर्यंत ५०० रुपये प्रमाणे १६ हजार ९ लोकांकडून ८० लाख ४ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला अशाप्रकारे २१ हजार ४७९ लोकांकडून ९० लाख ९८ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
झोन निहाय केसेस व आकारण्यात आलेला दंड ( लाखात)
लक्ष्मीनगर २७५९- १३७९५००
धरमपेठ ३०९४- १५४७०००
हनुमान नगर १९२०- ९६००००
धंतोली ९३२- ४६६०००
नेहरूनगर ८४२- ४२१०००
गांधीबाग१०२२- ५११०००
सतरंजीपुरा १००१- ५००५००
लकडगंज १४९५- ७४७५००
मंगळवारी १९३३- ९६६५००
मनपा मुख्यालय २११- १०५५००