लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : सोयाबीनची पेरणी आणि कपाशीची लागवड करताना आता बीबीएफ तंत्रज्ञान, रुंद सरी वरंबा पद्धतीचा वापर करा. बियाणे उगवणक्षमता चाचणी, बीजप्रक्रिया तसेच १० टक्के रासायनिक खतांचा वापर कमी करा, आदी मौलिक मार्गदर्शन मंडळ कृषी अधिकारी चंद्रशेखर कोल्हे यांनी शेतकऱ्यांना केले.
तालुक्यातील हेवती येथे खरीप हंगाम नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. तालुका कृषी कार्यालयामार्फत या प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन केल्या गेले. माती परीक्षण करा. त्यानुसारच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच पिकांच्या वाढीनुसार खतांचा वापर करणे. पिकांची फेरपालट करणे आदी महत्त्वपूर्ण बाबींकडेही शेतकऱ्यांचे लक्ष वेधल्या गेले. यावेळी हेवती येथील कृषी सहायक ए. जी. शिंदे, सरपंच सुरेखा वाघ, ग्रामसेवक जे. एन. मडावी, सायकी येथील कृषी सहायक जे. पी. गुंड, उपसरपंच भिकाजी भोयर, शिशुपाल शंभरकर, अर्चना चिंचोळकर तसेच गावकरी उपस्थित होते. यावेळी कोरोना लस घेण्याचे आवाहनसुद्धा करण्यात आले. या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांचे मार्गदर्शन लाभले.