नागपूर, : कोरोना चाचण्यांची संख्या वाढविणे, गर्दीवर नियंत्रण ठेवणे, लसीकरण पूर्ण क्षमतेने करणे आणि सोबतच कोणत्याच परिस्थितीत जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढणार नाही याची काळजी घेणे या सर्व आघाड्यांवर एकाच वेळी प्रशासनाला काम करायचे असून यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर सामंजस्याने व सहकार्याने पूर्ण गतीने कार्यरत व्हावे, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज येथे दिले.
जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरात रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत ही वाढ ठळकपणे पुढे येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना आजाराचा संसर्ग होणार नाही, यासाठी काही निर्बंध लावणे अनिवार्य होणार आहे. यासंदर्भात आज आरोग्य, महसूल, पोलीस व अन्य सर्व यंत्रणांच्या विभाग प्रमुखासोबत जिल्हाधिकाऱ्यांनी बचत भवन येथे आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, जिल्हा आरोग्य अधिकारी दीपक सेलोकर, जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातुरकर यांच्यासह आरोग्य यंत्रणेतील अधिकारी, महसूल, तसेच पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ज्या खासगी रुग्णालयात सिटीस्कॅन केले जाते, तेथे रुग्णांमध्ये कोविडची लक्षणे आढळल्यास त्याबाबत नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास किंवा शासकीय वैद्यकीय रुग्णालय-नियंत्रण कक्ष येथे त्या रुग्णाची माहिती त्वरित द्यावी. तसेच संबंधित रुग्णाला कोरोना चाचणी करण्यास सूचना द्याव्यात. यात दिरंगाई करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना ठाकरे यांनी यावेळी दिल्या.