नागपूर : अनियंत्रीत मर्सिडीज कारने डीपीला धडक दिल्याची घटना मंगळवारी रात्री १.३० वाजता अंबाझरी ठाण्यांतर्गत भगवाघर ले-आऊटमध्ये घडली.
अपघातात कार चालक आणि त्याच्या सहकारी महिलेला दुखापत झाली असल्याची माहिती आहे. गांधीनगर स्केटिंग मैदानाच्या जवळ राकेश मराठा यांचे घर आहे. त्यांच्या घरासमोर विजेची डीपी आहे. रात्री १.३० वाजता मर्सिडीज कार क्रमांक एम. एच. ३१, एन. बी-६९०० ने डीपीला धडक दिल्यामुळे मोठा आवाज झाला. कारचे बलून उघडले. हा आवाज ऐकून परिसरातील नागरिक बाहेर आले. कार चालक आणि महिलेने नागरिकांना मदत मागितली. नागरिकांनी त्यांना बाहेर काढून रुग्णालयात रवाना केले. नागरिकांनी घटनेची सूचना नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर अंबाझरी पोलीस घटनास्थळावर पोहोचले. पोलीस कार ठाण्यात घेऊन गेले. प्रत्यक्षदर्शींच्या मते कारचे बलून उघडल्यामुळे चालक आणि महिलेचा जीव वाचला. कार भगवाघर ले-आऊट येथील रहिवासी संजय अग्रवाल यांची असल्याची माहिती आहे. कारमध्ये कोण होते किंवा त्याचा कारमालकाशी काय संबंध आहे, याची माहिती मिळू शकली नाही. पोलिसांच्या मते अपघात तसेच सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करून तपास करण्यात येत आहे.
...............