नागपूर : क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे हे राजकारण करीत आहेत. त्यांच्याच खासदारांनी धाराशिव येथे पाकिस्तानचे झेंडे फडकवले होते. त्यामुळे पाकिस्तानचे झेंडे फडकवण्याचे पाप हे उद्धव सेनेने केले, असा टोला महसूलमंत्री तथा नागपूर-अमरावती जिल्ह्यांचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. भारत–पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि विरोधकांबाबत बावनकुळे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडा क्षेत्रास प्रोत्साहन दिल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा लौकिक वाढला आहे. मात्र उद्धव ठाकरे आज क्रिकेटवरून राजकारण करत आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी उद्धव ठाकरे परदेशी पर्यटनासाठी गेले होते; देशावर हल्ला झाल्यावर त्यांनी तातडीने परत यायला हवे होते, परंतु ते परतले नाहीत. यावरून हिंदू धर्माबद्दल आणि देशाबद्दल त्यांच्या मनात किती कळवळा आहे हे जनतेला दिसून आले. पहलगाम घटनेनंतरही ते लंडनमध्ये थांबले होते, असेही त्यांनी नमूद केले. खेळाच्या संदर्भात राजकारण सुरु करणे चुकीचे आहे; खेळ हा खेळ म्हणून बघावा, असेही ते म्हणाले. संजय राऊत यांच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष देत नाही; त्यांना कोणीही गंभीरपणे घेत नाही, असेही बावनकुळे म्हणाले.
ते बॅनर लोकांनी स्वयंस्फूर्तीने लावले नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘देवा तूच सांग’ जाहिरातीबाबत बावनकुळे म्हणाले की , महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविषयी प्रचंड प्रेम आहे. त्यांच्या कर्तृत्वामुळे लोकांनी आनंद व्यक्त केला आणि स्वयंस्फूर्तीने बॅनर लावले आहेत. १२ गड-किल्ले युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने आमचे सरकार समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम करत आहे. जाहिरातीमुळे कुणाला पोटदुखी होत असेल तर ते महाराष्ट्राच्या जनतेला समजत आहे, असेही त्यांनी सांगितले.