कुही : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली माेटरसायकल स्लिप झाल्याने दुचाकीवरील दाेघेही खाली काेसळले. त्यात एकाचा मृत्यू झाला तर अन्य एक गंभीर जखमी झाला. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-आंभाेरा राेडवरील टेंभरी शिवारात गुरुवारी (दि. ७) रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.
रोशन आनंद बाेंद्रे (३०) असे मृताचे तर आशिष मारोडे (२९) असे जखमीचे नाव आहे. दोघेही रा. मांगली, ता. कुही येथील रहिवासी आहेत. ते एमएच-४०/बीडी-९३६४ क्रमांकाच्या माेटरसायकलने कुहीहून मांगली येथे जात हाेते. या मार्गावरील टेंभरी शिवारातील नाल्यात चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव माेटरसायकल स्लिप झाली. त्यामुळे दाेघेही खाली काेसळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून दाेघांनाही कुही येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती राेशनला मृत घाेषित केले. शिवाय, आशिषवर प्रथमाेपचार करून त्याला उपचारासाठी नागपूरला पाठविण्यात आले. याप्रकरणी कुही पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, तपास पाेलीस शिपाई भागवत गुट्टे करीत आहेत.