नागपूर : अजनी रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. त्यानुसार, अजनी रेल्वे स्थानकावर आणखी दोन प्लॅटफार्म तयार करण्यात येणार असून, ३ अंडरपासेस आणि पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नागपूर विभागाच्या वार्षिक निरीक्षण दौऱ्यानिमित्त आलेले असताना, महाव्यवस्थापकांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अजनी रेल्वे स्थानकाचे महत्त्व वाढविण्यात येईल. त्यासाठी अजनी रेल्वे स्थानकाचा विकास करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. अजनी रेल्वे स्थानकावर आणखी दोन प्लॅटफार्म तयार करण्यात येतील. त्याचप्रमाणे, तीन अंडरपासेस तयार करण्यात येतील. अजनी रेल्वे स्थानकावर पार्किंगची व्यवस्था सुधारण्यात येणार आहे. नागपूर विभागात प्रवासी सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येईल. दिव्यांगांना सुविधा देण्यासाठी प्राधान्य राहिल. अजनी येथे १२ हजार हॉर्स पॉवर रेल्वे इंजिनच्या देखभालीचे काम करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
............
मनिषनगर अंडरपाससाठी निधी देणार
मनिषनगर अंडरपासचे काम महामेट्रोच्या वतीने करण्यात येणार असल्याचे महाव्यवस्थापक मित्तल यांनी सांगितले. त्यासाठी रेल्वे प्रशासन निधी उपलब्ध करून देणार आहे. मनिषनगर अंडरपाससाठी निधीचा तुटवडा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मेकॅनाइज्ड लाँड्री कोरोनामुळे बंद
अजनी येथे मेकॅनाइज्ड लाँड्रीचे काम पूर्ण झाले आहे. फेब्रुवारी महिन्यात तेथे अत्याधुनिक मशीन लावण्यात आल्या आहेत, परंतु कोरोनामुळे मेकॅनाइज्ड लाँड्री सुरू होऊ शकली नाही. रेल्वे बोर्डाने सूचना दिल्यानंतर ही लाँड्री सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
अजनीत झाडे लावल्याची खात्री करणार
अजनी इंटर मॉडेल स्टेशनचे काम एनएचएआय आणि रेल्वे लँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटीतर्फे करण्यात येणार आहे. त्यासाठी अजनी कॉलनीतील झाडे तोडण्यात येणार आहेत. झाडे तोडण्याची परवानगी महापालिकेकडून घेण्यात येणार आहे, परंतु नवीन झाडे लावण्यात आली की नाही, याची खात्री करूनच झाडे तोडण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे महाव्यवस्थापक मित्तल यांनी सांगितले.