सावनेर : जुनी भिंत कमकुवत होऊन पडल्याने दोघांचा मृत्यू तर एक जखमी झाल्याची घटना सावनेर तालुक्यातील बोरूजवादा येथे शनिवारी सकाळी 6.25 वाजता घडली. सुरेश रामकृष्ण करनरकर (30), अतुल शिवराम उईके (17) अशी मृतांची नावे आहेत. या दुर्घटनेत अतुलची आई उर्मिला शिवराम उईके या गंभीर जखमी झाल्या आहे. मृतक आणि जखमी हे बोरुजवाडा येथे जुन्या घरी भाड्याने राहत होते. पावसामुळे विटांची भिंत कमकुवत झाली होती. भिंत कोसळून खाली पडली तेव्हा भिंतीखाली तिघेही आले असल्याने ही विदारक घटना घडली. या घटनेची माहिती गावात काही क्षणातच पसरली. यानंतर घटनास्थळी गावकऱ्यांनी गर्दी केली. सावनेर पोलीस ठाण्याचे ए.एस.आय. अनिल तिवारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांचे मृतहेद शवविच्छेदनासाठी पाठवले. दुर्घटनेतील जखमी महिला उर्मिला यांना नागपूर मेयो रुग्णालयात हलवण्यात आले आहे. गेल्या 10 वर्षापासून तिघेही भाड्याने बोरुजवडा येथे राहत होते. मृतक हे मोल मजुरीचे काम करणारे होते.
नागपुरात घराची भिंत कोसळून दोघांचा मृत्यू; महिला गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 09:28 IST